नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा, 16 जून : वर्धेच्या म्हसाळा परिसरातील बनावट कापूस बियाणे कारखाना प्रकरणाच्या तपासकरिता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ‘एसआयटी’ स्थापना केली आहे. एसआयटीत पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी एकूण पंधरा सदस्यांची नियुक्ती केली. तपास करणाऱ्या या एसआयटीच्या प्रमुखसह सदस्यांना प्रत्येक चोवीस तासात केलेल्या तपासाची माहिती पोलीस अधीक्षकांना द्यावी लागणार आहे. काय आहे प्रकरण? पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी बोगस कापूस बियाण्याच्या कारखान्यावर धाड टाकत कारवाई केली. या कारवाईमुळे अनेक शेतकरी फसण्यापासून वाचले आहे. या कारखान्याच्या मुख्य सूत्रधारला अटक करण्यात आली आहे. मात्र, हे रॅकेट कुठपर्यंत पोहचले आहे. कोणाला बोगस बियाणे विकण्यात आले, यांचे साथीदार कोण याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षकांनी सेवाग्रामचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना केली. यात पोलीस निरीक्षक चकाटे हे प्रमुख असून चार पोलीस उपनिरीक्षक आणि 10 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. वाचा - अजितदादांची सर्व लवाजमा सोडून छुपी भेट; ‘तो’ कारखाना पुन्हा चर्चेत; भाजप म्हणाले मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता प्रकरणाचा सर्वबाजूनी तपास ह्यावा; याकरिता एसआयटीत स्थानिक गुन्हे शाखा, सायबर यांच्यासह पोलीस, सेवाग्राम स्टेशनचे पोलीस उपनिरक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे. एकूण 5 अधिकाऱ्यांसह 10 कर्मचाऱ्यांचा समावेश एसआयटीत आहे. या प्रकरणात सध्या दहा आरोपीना पोलिसांनी अटक केली. तर इतर आरोपीच्या शोधात पथक रवाना करण्यात आले आहे. बोगस बियाण्याच्या कारखान्याचा वर्ध्याच्या पोलीस अधीक्षकांनी भांडाफोड केल्यावर गृहमंत्र्यांसह कृषीमंत्री यांनी वर्धा पोलिसांना कौतुकाची थाप देत पोलीस अधीक्षकांचे अभिनंदन केले. मागील 3 ते 4 वर्षांपासून सुरू असलेल्या बोगस बियाणे कारखान्याकडे कृषी विभागाचे लक्ष न जाणे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. हे रॅकेट कृषी विभागातीलचं काही अधिकाऱ्यांच्या मुक संमतीने सुरू होते; अशी चर्चा रंगू लागली आहे. पोलीस त्या दृष्टीने देखील तपास करीत असून या प्रकरणात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.