मुंबई, 8 सप्टेंबर : घरात पती-पत्नीची (Husband and Wife) छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडणं होत असतात. कधीकधी वाद विकोपाला जातात, तर कधी कुरबुरीनंतर भांडणं मिटतात. पण उत्तर प्रदेशमधून पती-पत्नीच्या भांडणाचं एक गंभीर प्रकरण समोर आलंय. कानपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पत्नीने पतीविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पतीने बदला घेण्यासाठी विचित्र कृती केली. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय.
पीडित महिलेचा आरोप आहे की, तिच्या पतीने तिचा फोन नंबर 30 मित्रांना वाटला आणि तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. पतीच्या मित्रांनी अश्लील मेसेज पाठवल्याचंही तिने म्हटलंय. मंगळवारी (6 सप्टेंबर) पीडितेने या घटनेची पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर आयुक्तांनी कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
कानपूरमधील चकेरी भागातील हे प्रकरण असून, इथं राहणाऱ्या आकाशचं लग्न 2019 मध्ये श्यामनगर येथील महिलेशी झालं होतं. लग्नाच्या 2 वर्षानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला, आकाशच्या कुटुंबीयांनी खोटं बोलून आपलं लग्न लावून दिल्याचा महिलेचा आरोप आहे. आकाश कोणतंच काम करत नसल्याने वाद व्हायचे. लग्नात तिच्या आई-वडिलांनी 15 लाख रुपये खर्च केले होते. महिलेचा आरोप आहे की 2021 मध्ये तिला मारहाण करून घराबाहेर काढण्यात आलं, त्यानंतर तडजोडीचे आणि समजावण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. पण काहीच फायदा झाला नाही, त्यामुळे तिने 2022 मध्ये आकाश आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध हुंडाविरोधी कायद्यांतर्गत तक्रार दिली.
‘आय लव्ह यू’ ऐकण्यासाठी रोमिओ झाला वेडा, विवाहित महिलेनं शिकवला चांगलाच धडा पत्नीच्या या तक्रारीनंतर आकाश इतका संतापला की त्याने तिची बदनामी करण्यासाठी त्याने तिचा फोन नंबर 30 मित्रांमध्ये वाटून दिला. नंतर तिला अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडिओ येऊ लागले. ‘मी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली पण पोलिसांनी ती गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे मी तक्रार घेऊन आयुक्तांकडे आले,’ असं पीडित महिलेनं म्हटलंय. महिला कक्षाच्या एसीपींना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
“मी पती आकाश आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध हुंडाविरोधी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. माझी बदनामी करण्यासाठी त्याने माझा फोन नंबर मित्रांना दिला. त्यानंतर मला अश्लील मेसेज आणि व्हिडिओ येऊ लागले. मी या सर्वामुळे कंटाळले असून, आता जगणंही कठीण झालंय. त्यामुळे न्याय मागण्याचा अर्ज देण्यासाठी मला पोलीस आयुक्तांकडे यावं लागलं,’ अशी व्यथा पीडित पत्नीनं मांडली आहे.