आग्रा, 21 डिसेंबर : वर्दळीच्या रस्त्यावर मोटारसायकल अचानक थांबते. मोटारसायकल्याच्या मागच्या सीटवर बसलेला तरुण रस्त्यावर उभ्या असलेल्या एका समोर असलेल्या व्यक्तीवर अगदी जवळून तीन गोळ्या झाडतो. आपलं काम झालं याची खात्री पटल्यावर कुणाला काही समजण्याच्या आत मारेकरी पसार होतात. एखाद्या हिंदी सिनेमात बऱ्याचदा दिसणारा हा प्रसंग प्रत्यक्षात घडला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहे.
कशी झाली हत्या?
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आग्रा (Agra) शहरातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. शहरात भर दुपारी गर्दीच्या रस्त्यावर एका प्रॉपर्टी डिलरवर गोळ्या झाडण्यात आल्या. हरीश पचौरी असं त्यांचं नाव आहे. ते 50 वर्षांचे होते. पचौरींचा हॉस्पिटलमध्ये नेत असताना मृत्यू झाला.
पचौरी रस्त्यावरुन फोनवर बोलत पायी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी त्यांच्या जवळ आलेल्या मोटारसायकलने गती कमी केली. पचौरींना काही समजण्याच्या आतच मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या.
पचौरी आणि त्यांच्या मारेकऱ्यामध्ये यावेळी झटापटही झाली. या झटापटीमध्ये गोळी झाडाणारा तरुण खाली पडला. मात्र त्याने पुन्हा उठून आणखी एक गोळी घातली. पचौरींना एकूण तीन गोळ्या लागल्याने ते रस्त्यावर कोसळले. पचौरी खाली कोसळलेले पाहताच त्यांचे मारेकरी पसार झाले.
A property dealer’s murder on a busy Agra intersection , caught on cctv . Amazing impunity . 24 hours after the incident ,still awaiting word from @agrapolice on arrests ... pic.twitter.com/k9ah4ChKMv
— Alok Pandey (@alok_pandey) December 20, 2020
हा सर्व प्रकार शनिवारी दुपारी घडला आहे. या प्रकरणात अजून एकालाही अटक करण्यात आली नाही. ‘पचौरी यांचे कुणाशी वैर होते का?’ याचा तपास सध्या करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. आग्रा शहरातील गर्दीच्या भागात भर दुपारी झालेल्या या गोळीबाराने शहरात खळबळ उडाली आहे. ‘पोलिसांनी तातड़ीनं आरोपींना अटक करावी’, ही मागणी आता करण्यात येत आहे.