मुंबई, 13 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. लैंगिक अत्याचार तसेच फसवणुकीच्याही घटना घडत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील आयआयटीच्या विद्यार्थ्यासोबत एका उच्चशिक्षित दाम्पत्याने धक्कादायक कृत्य केले. एका समलैंगिक ॲपच्या माध्यमातून मुंबईतील आयआयटीच्या विद्यार्थ्याशी ओळख केली गेली. यानंतर त्याच्यावर अनैसर्गिक पद्धतीने लैंगिक अत्याचार करत त्याला ‘लैंगिक गुलाम’ बनविण्याचा अत्यंत भयानक प्रकार समोर आला आहे. एका उच्च शिक्षित दाम्पत्याने या आयआयटीच्या विद्यार्थ्यावर अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी कायदा, माहिती व तंत्रज्ञान, जादूटोणा कायद्यासह, अनैसर्गिक अत्याचार, हत्येचा प्रयत्न यानुसार या दाम्पत्यावर गुन्हा नोंदवला आहे. शुभ्रो बॅनर्जी आणि मनश्री असे या आरोपी उच्च शिक्षित दाम्पत्याचे नाव आहे. पवईतील क्रिस्टल टॉवरमध्ये ते राहतात. शुभ्रोची आयआयटीतील एका 33 वर्षीय विद्यार्थ्याशी समलैंगिक ॲपवरून ओळख झाली होती. या ओळखीनंतर शुभ्रोने या विद्यार्थ्याला मारहाण केली आणि त्याच्यावर अमानुषपणे अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. विद्यार्थ्यावर वसतिगृहातील खोलीत आणि घरी शुभ्रोने हे अत्याचार केले. इतकेच नव्हे तर त्याने गुवाहाटीमधील एका देवीचा प्रसाद विद्यार्थ्याला खायला दिला आणि अंगारा लाऊन जप, तप, मंत्र आणि टॅरट कार्डचा वापर करून त्याला संमोहित केले. तसेच विद्यार्थ्याच्या हातात, गळ्यात दोरे बांधून आणि अंगावर मेणबत्तीचे चटके देत शुभ्रो त्याच्याशी तांत्रिक सेक्स करत असे. म्हणजे याप्रकारे या विद्यार्थ्याला त्याने लैंगिक गुलाम (सेक्स स्लेव्ह) केले होते. त्याने या विद्यार्थ्याचे पासपोर्ट तसेच सगळी कागदपत्रे ताब्यात घेतली होती. हेही वाचा - IIT Bombay : एकटेपणाला कंटाळला? सातव्या मजल्यावरुन उडी घेत मुंबईत IIT च्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल शुभ्रो हा जप, तप, मंत्र वगैरे म्हणत हातावर कापूर जाळून संबंधित विद्यार्थ्याला तांत्रिक सेक्स करायला भाग पाडायचा. तसेच तांत्रिक सेक्स आणि टॅरट कार्डचा वापर करून संमोहनाद्वारे तो तरुणाला बेशुद्ध करायचा आणि अंगावर मेणबत्तीचे गरम थेंब टाकायचा. शुभ्रोने दुधामध्ये गुंगीचे औषध मिसळून विद्यार्थ्याच्या काही कागदपत्रांवर सह्या करून तीन फॉर्म भरून घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे. आरोपीच्या पत्नीचाही कृत्यात सहभाग - बॅनर्जी दाम्पत्याविरोधात गेल्या वर्षी 25 ऑक्टोबर रोजी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. बॅनर्जीची पत्नी मनश्री हिचीही पतीच्या कृत्यात साथ होती. मनश्रीने तरुणाविरोधात पोलीस ठाण्यात खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.