ठाणे, 20 जानेवारी : नवीन कपडे नाही म्हणून ठाण्यातील (Thane) दोन अल्पवयीन तरुणांनी धार धार चाकू घेवून समोर येईल त्याला भोसकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे पोलिसांनी (Thane Police) पाठलाग करून अखेर या दोन्ही माथेफिरूंना अटक केली.
रविवारी रात्री साडे बाराच्या सुमारास ठाण्यातील प्रदीप जैन नावाची व्यक्ती घरी जात असताना अचानक दोन तरुण त्यांच्या समोर आले आणि दोघांनीही प्रदीप यांच्यावर सपासप वार करत त्यांचा मोबाईल आणि पाकीट चोरुन निघून गेले. नेमकं काय घडलं हे जैन यांना कळालेच नाही. त्यांनी 100 नंबरवर फोन केला आणि घडलेल्या घटनेची माहिती दिली. कंट्रोल रुमने त्यांची माहिती लिहून घेतायेत तोच कंट्रोल रुममध्ये आणखी एक फोन आला जैन यांच्यावर ज्या पद्धतीने हल्ला करुन त्यांना लुटण्यात आले होते, तशाच पद्धतीने आणखी एका व्यक्तीला कॅडबरी सर्कलजवळ दीपक विश्वकर्मा या नागरिकाला देखील भोसकून लुटण्यात आले होते.
कंट्रोल रुमने तात्काळ वायरलेसवर मेसेज पाठवला आणि रात्री गस्तीवर असलेले पोलीस कामाला लागले. एका मागोमाग एक असे 7-8 फोन कंट्रोल रुममध्ये आले होते. फोन येताच कंट्रोल रुम पोलिसांना माहिती देत होते. त्या दिशेने पोलीस जात होते. कॅडबरी सर्कलनंतर चितळसर येथे रशीद मुगळे या रिक्षाचालकाला लुटले. नंतर पुढे लोकमान्यनगर येथे एका हाॅटेलात काम करणारा वेटर वर्तकनगर येथून जात असताना त्याला अडवून या दोघांनीही त्याला भोसकून त्याला लुटले.
10 मिनिटांनी पुढे लोकमान्यनगर येथील रेमंड कंपनीसमोर या दोन माथेफिरुंनी केशव पुजारी नावाच्या व्यक्तीला अडवले आणि त्याला ही भोसकून गंभीर जखमी करुन लुटले. अशा प्रकारे समोरुन येणाऱ्या रिक्षाचालकांना, पादचार्यांना व सुरक्षारक्षकांना माथेफिरु हल्लेखारांनी गंभीर दुखापत करुन त्यांना लुटले होते. याच माथेफिरु हल्लेखोरांचा माग काढत चितळसर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मंगेश बोरसे, हवालदार पाटील, राठोड, बंडगर हे फिरत होते. वायरलेस वरुन आलेल्या माहितीमुळे ठाण्यात ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. दोघेही हल्लेखोर चितळसर येथे पोहोचले आणि त्यांनी नाकाबंदी पाहिली असता ते उलट्या दिशेने पळू लागले. पीएसआय मंगेश बोरसे आणि टीम ने लगेच त्यांचा पाठलाग केला आणि दोघा माथेफिरुंना हिरानंदानी मेडोज येथे पकडणार तोच एक माथेफिरु उडी मारुन पळून गेला. मात्र, त्याला काही तासांनी पोलिसांनी अटक केली.
विशेष म्हणजे, या दोन्ही माथेफिरुंनी हा सगळा प्रकार ज्या दुचाकीच्या साह्यायने केला ती दुचाकी देखील या दोघांनी ठाणेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून रेल्वे लगत पार्क केलेल्या पार्किंग मधून चोरली होती. दोघांची झडती घेतली असता 7 ते 8 मोबाईल, 3 चाकू, 5 पाकिटे आणि 2 हजार रुपये रोख असा मुद्देमाल पोलिसांनी या दोघांकडून जप्त केला. जर मंगेश बोरसे, हवालदार पाटील, राठोड, बंडगर या टीमने त्या दोन हल्लेखोरांचा पाठलाग करुन त्यांना बेड्या ठोकल्या नसत्या तर या दोघांनी एखाद्याच्या जीव ही घेतला असता. या दोन माथेफिरुंना पकडण्यासाठी पोलिसांना स्वॅगी बाॅईजची देखील मोठी मदत झाली.
तर चितळसर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मंगेश बोरसे, हवालदार पाटील, राठोड, बंडगर या पथकाचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी पुष्पगुच्छ देत आभार मानले. मनविसेचे उपशहराध्यक्ष संदीप चव्हाण, प्रमोद पत्ताडे, विभाग सचिव मयुर तळेकर, विभागध्यक्ष हेमंत मोरे तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.