नवी दिल्ली, 16 जानेवारी : प्रजासत्ताक दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी दिल्लीमध्ये युद्धपातळीवर तयारी सुरू असून, राजधानीतील सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली आहे. या दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने रविवारी (15 जानेवारी) दोन संशयितांना अटक केली आहे. या दोन संशयितांच्या चौकशीतून एक धक्कादायक खुलासा झाला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएसआयएस या दहशतवादी संघटनेकडून प्रेरित होऊन या दोन दहशतवाद्यांनी गेल्या महिन्यात दिल्लीत एका 21 वर्षीय तरुणाचा शिरच्छेद केला होता. या दोघांनी तरुणाच्या हत्येचा 37 सेकंदांचा व्हिडिओ देखील बनवला आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानस्थित दहशतवादी सोहेल याला पाठवला होता. याबाबत एका वृत्तवाहीनीने वृत्त प्रकाशीत केले आहे.
तरुणाची हत्या
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एकाचं नाव नौशाद आहे. नौशादला त्याचा आका सोहेलनं भारतात पाठवलं होतं अशी माहिती समोर येत आहे. हा सोहेल पाकिस्तानमधील हरकत-उल अन्सार या दहशतवादी संघटनेचा संचालक आहे. अटक केलेल्या दोन्ही व्यक्तींनी कबूल केलं आहे की, त्यांनी पीडित तरुणाला 14 डिसेंबर रोजी दिल्लीतील भालस्वा डेअरी येथे नौशादच्या घरी नेलं होतं. तिथे त्यांनी त्याचा गळा दाबून खून केला आणि नंतर त्याच डोकं धडापासून वेगळं केलं. त्याच्या मृतदेहाचे एकूण आठ तुकडे केले.
हेही वाचा : दारूड्या पतीमुळे उचलले शस्त्र; 24 गुन्हे, 50 हजारांचं बक्षीस; कोण आहे नक्षलवादी रेणुका मुर्मू?
अंमली पदार्थांचं व्यसन
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 21 वर्षीय तरुणाच्या शरीराचे अनेक भाग पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यामध्ये त्रिशूळ गोंदलेल्या हाताचा देखील समावेश आहे. मात्र, अद्याप पीडित तरुणाची ओळख पटलेली नाही. पीडित तरुणाला अंमली पदार्थांचं व्यसन असल्यामुळे त्याची दहशतवाद्यांशी मैत्री झाली होती, अशी माहिती समोर आली आहे.
आरोपींच्या चौकशीला सुरुवात
अटक केलेल्या दहशतवाद्यांनी आणखी कोणाला आपला बळी बनवलं आहे का, याचा शोध पोलीस आता घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नौशाद हा हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात तुरुंगात होता, तेव्हा त्याची सोहेलशी भेट झाली होती. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे अतिरिक्त सीपी पी. कुशवाह यांनी सांगितलं की, हे दहशतवादी उजव्या विचारसरणीच्या नेत्यांना लक्ष्य करण्याच्या विचारात होते. आरोपींकडून तीन पिस्तूल आणि 22 काडतुसं जप्त करण्यात आली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi, India, ISIS, Republic Day, Terrorists