रवि पांडेय, प्रतिनिधी वाराणसी, 10 एप्रिल : उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी एका तरुणाचा मृतदेह पडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्याचा गळा चिरून खून करण्यात आला होता. तसेच त्याची हत्या इतक्या निर्घृणपणे करण्यात आली होती की, मृतदेहाची ओळख पटण्यासाठी दोन दिवस लागले. दरम्यान, मृतदेहाची ओळख पटताच हा युवक वाराणसीच्या भरथरा गावातील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला पकडण्यास सुरुवात केली. ओळख पटल्यानंतर पोलिसांनी चौथ्या दिवशी मारेकऱ्यांना पकडले. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण - दोन सख्ख्या भावांनीच आपल्या भावाची हत्या केल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. तसेच हे तरुण मृताचे भाऊ होते. हत्येची ही घटना 3 एप्रिलला घडली होती. सुनील असे मृताचे नाव असून, तो भरथरा गावात पॉवरलूमच्या माध्यमातून साड्या विणण्याचे काम करायचा. त्याचे अनिल मौर्य आणि मुनील मौर्य हे दोन भाऊ आहेत. हे दोन्हीदेखील त्याला सहकारी म्हणून मदत करायचे. या दोघांनी मिळून 2 एप्रिलच्या रात्री आपल्याच भावाचा चाकूने गळा चिरून खून केला. हत्येचे कारण काय - वरुणा झोनचे डीसीपी आरती सिंह यांनी सांगितले की, मृत सुनील हा तीन भावांमध्ये मधला होता. तसेच तो यंत्रमाग कामात निपुण होता. पूर्वी घरात सध्या असलेल्या यंत्रमागाच्या वाट्यावरुन तिघांमध्ये वाद झाला होता. वादानंतर मृत सुनीलच्या भावांनी सुनीलला मार्गावरून हटवण्याचा कट रचला. त्याअंतर्गत 2 एप्रिलच्या रात्री काही कामाच्या बहाण्याने सुनीलला सोबत घेऊन गेले आणि रोहनिया पोलीस ठाणे हद्दीतील खुलसपूर परिसरात असलेली शांतता पाहून त्याठिकाणी सुनीलचा गळा चिरत त्याची हत्या केली. सीसीटीव्हीने रहस्य उघड - मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध सुरू केला. यादरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजही तपासले, ज्यामध्ये मृत सुनील आपल्या भावांसोबत जाताना दिसत होता. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही भावांची कसून चौकशी केली, त्यानंतर दोन्ही भावांनी हत्येची कबुली दिली. या घटनेने परिसर हादरुन गेला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.