विजय वंजारा, प्रतिनिधी मुंबई, 14 नोव्हेंबर : मुंबई उपनगरातील बोरीवली पश्चिम भागात मागील पंधरा ते वीस वर्षापासून वास्तव्यास असणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना मुंबई पोलिसांच्या अँटी टेररिझम सेलने अटक केली आहे. राज मिराज मंडल (22 वर्षे) आणि जियाऊल रोबिल शेख (39 वर्षे) अशी अटक केलेल्या बांग्लादेशी घुसखोरांची नावे आहेत. मुंबईच्या बोरीवली पश्चिमेकडील भाजी मार्केट आणि एमटीएनएल बस स्टॉप या ठिकाणाहून दोघाही घुसखोरांना ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पश्चिमेकडील भाजी मार्केट आणि एमटीएनएल बस स्टॉप परिसरात बांगलादेशी नागरिक येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून अँटी टेररिझम सेलला मिळाली होती. यानुसार पथक तयार करून गुप्त बातमीदाराला यासंबंधीची खात्री करून घेण्यास सांगितले. यानंतर पंच आणि तपास पथकांनी जाऊन भाजी मार्केट परिसरातून एक बांगलादेशीला ताब्यात घेतलं आणि एमटीएनएल बस स्टॉप परिसरातून दुसऱ्या बांगलादेशीला ताब्यात घेतले. अँटी टेररिझम सेल पथकातील तपास अधिकाऱ्याने दोन्हीही बांगलादेशी नागरिकांकडे भारतात प्रवेश करण्यासाठी वापरलेले अधिकृत कागदपत्रे मागितले असता त्यांच्याकडे तसे कोणतेही कागदपत्र नसल्याचे सांगितले. यानंतर त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडून मोबाईल ताब्यात घेतले. मोबाईलची तपासणी केली असता ते बांगलादेशातील त्यांच्या नातेवाईकांसोबत संभाषण करण्यासाठी इमो नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन वापरत होते. हेही वाचा - खड्ड्यात पडलेल्या व्यक्तीनं केलं असं काम, अखेर अधिकाऱ्यांना रातोरात बांधावा लागला रस्ता त्यांच्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट डिरेक्टरी तपासली असता बरेचसे नंबर प्लस डबल एट (+८८) या कंट्री कोडने सुरू होत असल्याचे आढळून आले. यावरून ते बांगलादेशी नागरिक असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदवून न्यायालयासमोर सादर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली. दरम्यान, पोलिसांनी अधिकचा तपास केला असता ते बांग्लादेशातील गरिबी आणि उपासमारीला कंटाळून भारतात मुंबईत पोट भरण्यासाठी आल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे कोणत्याही दहशतवादी किंवा आतंकवादी संघटनांची सबंध असल्याचे त्यांनी नाकारले. सोमवारी त्यांना पुन्हा रिमांडसाठी न्यायालयात उभे केले असता त्यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.