मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

थरारनाट्य! अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न, मग खंडणीची मागणी; पोलिसांच्या एन्ट्रीनंतर पुढे काय झालं?

थरारनाट्य! अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न, मग खंडणीची मागणी; पोलिसांच्या एन्ट्रीनंतर पुढे काय झालं?

बंगळुरुमध्ये एका ड्रायव्हरनं आपल्या जीवावर खेळून एका सहा वर्षांच्या लहानग्याचं अपहरण करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे.

बंगळुरुमध्ये एका ड्रायव्हरनं आपल्या जीवावर खेळून एका सहा वर्षांच्या लहानग्याचं अपहरण करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे.

बंगळुरुमध्ये एका ड्रायव्हरनं आपल्या जीवावर खेळून एका सहा वर्षांच्या लहानग्याचं अपहरण करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे.

बंगळुरू, 4 जुलै : मुलं शाळेतून बस किंवा व्हॅननं येत असतील तर ती येईपर्यंत पालकांच्या जीवाला घोर लागलेला असतो. मुलांच्या सुरक्षिततेबद्दल त्यांना वाटणारी भीती अनेकदा खरीही ठरते. अशावेळेस व्हॅन किंवा बसच्या ड्रायव्हरवरच पालकांची भिस्त असते. बंगळुरुमध्ये एका ड्रायव्हरनं आपल्या जीवावर खेळून एका सहा वर्षांच्या लहानग्याचं अपहरण करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे (60-year-old school van driver rescues boy). टाईम्स ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर याबद्दलचं वृत्त देण्यात आलं आहे.

चित्रपटात असतं तसं हे थरारनाट्य बंगळुरुमध्ये प्रत्यक्षात घडलं आहे. बंगळुरुमधील 60 वर्षांचे मोहम्मद बाशा (Mohd. Basha) हे एका स्कूल व्हॅन ड़्रायव्हर म्हणून काम करतात. 30 जून रोजी त्यांच्या बसमधील सर्व मुलांना त्यांनी सोडलं, शेवटच्या एकाच मुलाला सोडायचं बाकी होतं. रस्त्यानं जात असताना एका महिलेनं त्यांना मध्येच अडवलं आणि आपल्या मुलीला शाळेत न्यायचं आणि सोडायचं काम कराल का, असं विचारलं. मी इथेच जवळ राहते आणि तुम्हाला घर दाखवते असं ती महिला बाशा यांना म्हणाली.

बाशा त्यांच्या व्हॅनमध्ये असलेल्या सहा वर्षांच्या मुलालाही बरोबर घेऊन त्या महिलेचं घर बघायला निघाले; पण त्या महिलेचं घर काही दिसेना. त्यामुळे बाशा त्या मुलाला घेऊन परत आपल्या व्हॅनच्या दिशेनं निघाले. मात्र तिथेच त्यांना जोरदार धक्का बसला.

“ज्या महिलेनं मला मुलीला सोडाल का असं विचारलं होतं, त्याच महिलेनं माझ्यावर हल्ला केला. तिच्याबरोबर एक धट्टाकट्टा तरुणही होता. ते दोघं मिळून माझ्याकडून मुलाला खेचण्याचा प्रयत्न करत होते. त्याचं अपहरण करण्याचा प्रयत्न करत होते,” असं बाशा यांनी सांगितलं. ती महिला मुलाला त्याच्या सीटवरून खेचण्याचा प्रयत्न करत होती तर तो तरुण सतत त्यांच्या चेहऱ्यावर मारत होता असंही त्यांनी सांगितलं. “खूप कष्टानं मी मुलाचा हात धरला आणि व्हॅनचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळेस तिथून जात असलेल्या काही व्यक्तींनी आमचा आरडाओरडा ऐकला आणि त्यांनी व्हॅनच्या दिशेनं धाव घेतली. तिथे जमलेली गर्दी पाहून ती महिला आणि तो तरुण दोघे पळून गेले. जेव्हा त्या महिलेनं मुलाला खेचण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचा काहीतरी गुन्हेगारी हेतू असल्याचं माझ्या लक्षात आलं. त्या मुलाला वाचवणं हे माझं कर्तव्य होतं. आणि ते मी केलं,” असं बाशा म्हणाले.

त्यानंतर बाशा यांनी या मुलाच्या आईला फोन केला आणि घडलेली घटना सांगितली. या मुलाची आई एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करते. आपल्या मुलाला घरी घेऊन जावं आणि आपण येईपर्यंत तिथेच थांबावं अशी विनंती या मुलाच्या आईनं बाशा यांना केली. दरम्यानं तिनं मुलाच्या वडिलांनाही फोन केला आणि त्यांनाही याबद्दल सांगितलं. ते एका खासगी फर्ममध्ये काम करतात. या मुलाचे आईवडील घरी आले आणि घाबरलेल्या मुलाला त्यांनी शांत केलं. अत्यंत धाडसाने आपल्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडल्याबद्दल, त्याचा जीव वाचवल्याबद्दल त्यांनी बाशा यांते आभार मानले(Attempt Of Kidnapping Failed).

पण ही गोष्ट इथंच संपत नाही. आपल्या मुलासोबत हे नेमकं काय घडलं आहे याचा धक्का अर्थातच त्याच्या आईवडिलांना बसला होता. तितक्यात त्याच्या आईच्या मोबाईलवर एक फोन आला, “आम्ही नुकतंच तुमच्या मुलाचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही लवकरच पुन्हा त्याला पळवून नेऊ. तुम्ही जर 5 लाख रुपये देण्याचं मान्य केलंत तरच आम्ही त्याचं अपहरण करणार नाही,” अशी धमकी एका व्यक्तीनं फोनवरून या मुलाच्या आईला दिली.

ही घटना वाटते त्यापेक्षा जास्त गंभीर असल्याचं मुलाच्या आईवडिलांच्या लक्षात आलं. त्यांनी बंगळुरु ग्रामीणमधील अवलाहल्ली (Avalahalli Police) पोलिसांशी संपर्क साधला आणि तक्रार दाखल केली. तिथले इन्सपेक्टर जनरल ऑफ पोलीस एम.चंद्रशेखर यांनी तातडीनं स्पेशल पथकं तयार केली. सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस (SP) कोना वाम्सी कृष्णमा आणि अतिरिक्त एसपी (Additional SP) लक्ष्मी गणेश के. यांच्या नेतृत्वाखाली ही पथकं लगेचच कामाला लागली. तर काही वरिष्ठ पोलिसांनी संशयित आणि त्याच्या मोबाईल नंबरवर लक्ष ठेवलं. डीएसपी (DSP) उमा शंकर आणि पोलीस इन्सपेक्टर (Police Inspector) प्रकाश हेही या कामगिरीत सहभागी होते. त्यांना साध्या वेषात संशयिताचा पाठलाग केला आणि खासगी गाड्या तसंच मोटारबाईक्सच्या मदतीनं त्यांनी संशयितावर नजर ठेवली.

त्याच दरम्यान, संशयितानं पुन्हा मुलाच्या आईला फोन केला आणि त्यांना पाच लाखांऐवजी आता दोन लाख रुपये मागितले. “माझं तुमच्याशी कोणतंही वैयक्तिक वैर नाही. मला तुमच्या मुलाचं अपहरण करण्यासाठी कोणीतरी सुपारी दिली आहे. तुम्ही जर मला आज रात्रीपर्यंत 2 लाख रुपये दिले तर मला कोणी सुपारी दिली आहे त्याचं नाव मी तुम्हाला सांगेन, ” असं त्या व्यक्तीनं मुलाच्या आईला सांगितलं. हे संभाषण सुरु राहण्यासाठी, त्या संशयिताचा संपर्क होत राहावा यासाठी आपण पैसे द्यायला तयार आहोत असं मुलाच्या वडिलांनी त्या व्यक्तीला सांगितलं. “ती व्यक्ती दरवेळेस वेगवेगळ्या नंबरवरून फोन करत होती. एका बॅगेत पैसे घेऊन मध्यरात्री होस्कोटेमधील MVJ कॉलेजच्या जवळ त्याच्या फोनची वाट बघायला त्यानं आम्हाला सांगितलं, ” अशी माहिती मुलाच्या वडिलांनी दिली.

मात्र फोन करणारी व्यक्ती सतत भेटण्याचं ठिकाण बदलत होती. आधी MVJ कॉलेज नंतर होस्कोटेजवळचा टोलनाका आणि त्यानंतर कटमनाल्लूर क्रॉस अशी ठिकाणं त्यानं बदलली. या मुलाचे वडील फोन करणाऱ्या व्यक्तीला भेटायला कारमधून निघाले, तेव्हा पोलीसही त्यांच्या गाडीतून जवळपासस 300 मीटरचं अंतर ठेवून त्यांच्या मागे जात होते.

“शेवटी पहाटे 3.30 वाजता फोन करणाऱ्या व्यक्तीनं कटमनाल्लूर गेटजवळच्या ब्रिटजवळ पैशांची बॅग ठेवायला सांगितलं. पोलिसांनी सांगितल्यानुसार मी ब्रिजपासून काही अंतरावर बँग फेकली. म्हणजे त्या व्यक्तीला बॅगेपर्यंत येण्यासाठी किमान पाच मिनिटं तरी चालत यावं लागेल. ही युक्ती अगदी सफल झाली. तो माणूस बॅग घ्यायला तिथे पोहोचला आणि पोलिसांनी त्याला घेराव घातला आणि त्याला पकडलं,” हा सगळा थरार मुलाच्या वडिलांनी सांगितला.

ज्याला ताब्यात घेतलं त्या संशयिताचं नाव शक्तीवेलू आहे. तो 20 वर्षांचा असून के.आर. पूरम इथं राहतो. तर त्याची मैत्रीण सुनीता जोसेफ ही 30 वर्षांची असून, ती केआर पूरमजवळ मार्गोंडनल्लीमध्ये राहते. “शक्तीवेलूचे वडील सुरेश कुमार हे केआर पूरम आणि त्याच्या जवळपासच्या भागात गेली 25 वर्ष स्कूल व्हॅन ड्रायव्हर म्हणून काम करतात. एप्रिल महिन्यात शक्तीवेलूने या सहा वर्षांच्या मुलाला जवळपास एक महिना शाळेत न्यायचं आणि सोडायचं काम केलं. त्याचवेळेस त्यानं सुनीताबरोबर हे अपहरण करण्याची योजना आखली. याआधीही शक्तीवेलूच्या विरोधात चोरीचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत,” अशी पोलिसांनी दिली.

शक्तीवेलूला दारुचं व्यसन आणि त्याच्यावर मोठं कर्जही आहे. बाशाची स्कूल व्हॅन शाळेत मुलांना कधी सोडते, परत कधी नेते, त्यांचा मार्ग कोणता यावर शक्तीवेलूने एक आठवडा लक्ष ठेवलं होतं. “ज्या थोड्या काळासाठी शक्तीवेलूनं मुलाला शाळेत सोडलं होतं, तेव्हा त्यानं त्याचे आईवडील, मोठा भाऊ या सगळ्यांना पाहिलं होतं. त्यानंतर हे कुटुंब दुसरीकडे राहायला गेलं. पण शक्तीवेलूकडे मुलाच्या आईचा मोबाईल नंबर होता. या मुलाचे आईवडील हे दोघेही नोकरी करतात म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असा शक्तीवेलूचा समज झाला. आपण जर त्यांच्या लहान मुलाचं अपहरण केलं तर त्याला सोडवण्यासाठी ते खंडणी म्हणून मोठी रक्कम नक्की देतील, असं त्याला वाटलं. त्याला दारुचं व्यसन आहहे आणि भरपूर कर्जही आहे. त्यामुळेच त्यानं हे अपहरणाचं नाटक रचलं ,” अशी माहिती पोलिसांनी दिली.

सुदैवाने बाशासारखा ड्रायव्हर या मुलासोबत होता म्हणून शक्तीवेलूचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. पोलिसांनीही तातडीनं हालचाली केल्यामुळे लगेचचं संशयिताला पकडता आलं.

First published:

Tags: Crime news, Kidnapping, Police