कोईम्बतूर, 14 मार्च : आपल्या देशामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मर्यादित प्रमाणात उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांसाठी प्रचंड स्पर्धा आहे. अशा परिस्थितीमध्ये निरक्षर किंवा जेमतेम शिक्षण झालेल्यांना काम मिळण्याची शक्यता फारच कमी झाली आहे. काहीजणांना तर दोनवेळच्या जेवणाचादेखील प्रश्न सतावत आहे.
अशाच परिस्थितीतून जाणाऱ्या तमिळनाडूमधील एका तरुणानं जेवण मिळवण्याचा एक जगावेगळा पर्याय शोधून काढला. तुरुंगातील जेवण मिळवण्यासाठी त्यानं पोलिसांना फोन करून बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली व स्वत:ला अटक करवून घेतली. 'टाइम्स नाऊ'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणाऱ्या तरुणाचं नाव संतोष कुमार आहे. 34 वर्षांचा संतोष कोईम्बतूर येथील रहिवासी असून त्यानं चेन्नईतील पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी धमकी देणारा फोन केला होता. या फोनवर त्यानं इरोडमधील रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडवर स्फोट घडवून आणण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याला शनिवारी (11 मार्च) अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी बाजारपेठांसह अनेक ठिकाणी बॉम्बचा शोध घेतला पण त्यांना काहीही सापडलं नाही. त्यानंतर अधिकार्यांच्या असं लक्षात आलं की, फोन करणाऱ्या व्यक्तींनं दिशाभूल केली आहे. अधिक तपास करून पोलिसांनी फोन करणाऱ्या संतोषला अटक केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशी केली असता संशयितानं सांगितलं की, तो बेरोजगार आहे आणि आपला उदरनिर्वाह करण्यासाठी धडपडत आहे.
शौचालयाला गेली महिला, नराधमाने साधला डाव अन् केलं भयानक कृत्य
आरोपी संतोषनं पोलिसांना सांगितलं, बनावट धमकीचा फोन केल्यानंतर पोलीस त्याला तुरुंगात टाकतील. तिथे गेल्यानंतर किमान नियमित जेवण तरी मिळेल, अशी त्याला खात्री होती. 2019 आणि 2021 मध्येदेखील तो अशाच प्रकारे तुरुंगात गेला होता.
संतोष कुमारवर भारतीय दंड संहितेतील (आयपीसी) कलम 506 (गुन्हेगारी धमकीसाठी शिक्षा) आणि 507 (निनावी संप्रेषणाद्वारे गुन्हा करण्याची धमकी) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते. त्याचा जबाब नोंदवल्यानंतर त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं होतं. त्यांनी त्याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
प्रसिद्ध अमेरिकन लेखक ओ हेन्रीनं 1904 मध्ये लिहिलेल्या 'द कॉप अँड द अँथम' या कथेमध्ये संतोष कुमार ज्या परिस्थितीत आहे त्याबाबत मार्मिक भाष्य केलेलं आहे. ज्यामध्ये सोपी नावाचा नायक तीन वेळचं जेवण मिळवण्यासाठी आणि हिवाळ्यात उबदार अंथरुण मिळावं यासाठी तुरुंगात हिवाळा घालवण्याचा प्रयत्न करतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.