जालना, 14 मे: मागील काही दिवसांपासून राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा (Remdesivir Injection) काळाबाजार (Black market) सुरू आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या अनेकांना पोलिसांनी आतापर्यंत जेरबंद केलं आहे. तरीही रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या गुन्हेगारांना अपेक्षित चाप बसवता आला नाही. गेल्या आठवड्यात औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जालन्यात मोठी कारवाई करत रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. ही घटना ताजी असताना पुन्हा रेमडेसिवीर चढ्या दरानं विकणारी टोळी सक्रिय झाली आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी जालन्यातील जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वॉर्डमध्ये ठेवण्यात आलेल्या दोन रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी करण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कारवाईची धमकी दिली होती. कारवाईची धमकी दिल्यानंतर अवघ्या 7 तासांत चोरट्यानं संबंधित चोरीला गेलेले रेमडेसिवीर पुन्हा आहे त्या जागी ठेवले आहे. याप्रकरणी जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गायब झालेले दोन रेमडेसिवीर इंजेक्शन रात्री नऊच्या सुमारास परत आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. हे रेमडेसिवीर इंजेक्शन नेमके कोणी चोरले होते. याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र रुग्णालयात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी हे इंजेक्शन चोरले असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहेत. त्या अनुषंगाने पोलीस सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. हे ही वाचा- मुलुंड कोविड सेंटरचा ऑक्सिजन बचतीचा नवा पॅटर्न हिट; 50 टक्क्यांपर्यंत होतेय बचत याआधी 27 एप्रिल रोजी औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जालन्यात येऊन मोठी कारवाई केली होती. रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता. त्यानंतरही जालन्यात रेमडेसिवीर चढ्या दरानं विकणारी टोळी सक्रिय झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







