मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

भुयार खोदून केली रेल्वे इंजिनची चोरी; लोखंड चोरांच्या सुळसुळाटामुळे पोलीस त्रस्त

भुयार खोदून केली रेल्वे इंजिनची चोरी; लोखंड चोरांच्या सुळसुळाटामुळे पोलीस त्रस्त

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पोलिसांनी एका चोरीच्या घटनेबाबत तिघांना ताब्यात घेतल्यानंतर ही बाब समोर आली.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Bihar, India

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वेचं विस्तीर्ण जाळं तयार करण्यात आलेलं आहे. भारतीय रेल्वे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहचली आहे. आजही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नागरिक रेल्वेला प्राधान्य देतात. रेल्वेतून प्रवास करताना बोगीच्या आतमध्ये किंवा स्टेशनवर विविध सूचना लिहिलेल्या तुम्ही नक्कीच पाहिल्या असतील.

'रेल्वेची संपत्ती तुमचीच संपत्ती आहे. कृपया तिची काळजी घ्या', अशा कितीतरी सूचना बोगीच्या आतमध्ये ठिकठिकाणी लिहिलेल्या असतात. या सूचना बिहारमधील काही चोरट्यांनी जास्तच गांभीर्यानं घेतल्याचं दिसत आहे. या चोरट्यांनी रेल्वे आपली स्वत:चीच संपत्ती असल्याप्रमाणे रेल्वेच्या इंजिनासह अनेक पार्ट्स चोरण्याचा धडाका सुरू केला आहे. एका घटनेमध्ये तर रेल्वे इंजिनच्या चोरीसाठी चोरट्यांनी बरौनी ते मुझफ्फरपूरपर्यंत एक भुयार खोदल्याचं उघड झालं आहे. ‘नवभारत टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

बरौनी ते मुझफ्फरपूर हे अंतर जवळपास 100 किलोमीटर आहे. बारगी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. पोलिसांनी गुरुवारी सांगितलं की, लुटारूंच्या अनेक टोळ्या बिहारमध्ये डिझेल, जुन्या ट्रेनची इंजिन चोरी आणि स्टीलचे पूल चोरत आहेत. त्यामुळे पोलिसांची झोप उडाली आहे. गेल्या आठवड्यात एका टोळीने बरौनी येथील गरहारा यार्डमध्ये दुरुस्तीसाठी आणलेल्या ट्रेनचं संपूर्ण डिझेल इंजिन चोरून नेलं.

पोलिसांनी एका चोरीच्या घटनेबाबत तिघांना ताब्यात घेतल्यानंतर ही बाब समोर आली. चौकशीदरम्यान त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर, पोलिसांनी मुझफ्फरपूरच्या प्रभात कॉलनीमध्ये असलेल्या एका भंगार गोदामातून इंजिनचे सुटे भाग असलेली 13 पोती जप्त केले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, 'याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्हाला यार्डाजवळ एक बोगदा सापडला. ज्यातून चोरटे यायचे आणि इंजिनचे पार्ट पोत्यात भरून घेऊन जात.

हेही वाचा - लग्नाच्या वाढदिवशी पत्नी वाट बघत होती, पण पती परतलाच नाही; भाजप नगसेवकासोबत घडलं भयानक

या पूर्वीही घडल्या आहेत इंजिन चोरीच्या घटना - 

या पूर्वी पूर्णियामध्ये चोरट्यांनी एक संपूर्ण विंटेज स्टीम इंजिन विकलं होतं. लोकल रेल्वे स्थानकावर सार्वजनिक प्रदर्शनासाठी हे इंजिन ठेवण्यात आलं होतं. या चोरीमध्ये एका रेल्वे अभियंत्याचाही सहभाग असल्याचं तपासादरम्यान पोलिसांना आढळलं होतं.

लोखंडी पुलदेखील चोरट्यांच्या निशाण्यावर - 

आणखी एका टोळीनं बिहारमधील अररिया जिल्ह्यातील सीताधार नदीवरील लोखंडी पुलाचे भाग वेगळे करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर, पोलिसांना एफआयआर नोंदवून पुलाच्या संरक्षणासाठी एक हवालदार नियुक्त करावा लागला. या शिवाय, फोर्ब्जगंज ते राणीगंजला जोडणाऱ्या पलटानिया पुलाचे काही लोखंडी अँगल आणि पुलाचे इतर महत्त्वाचे भाग चोरीला गेल्याचं उघडकीस आलं आहे. फोर्ब्जगंज पोलीस स्टेशनचे प्रभारी निर्मल कुमार यादव यांनी गुरूवारी टाइम्स न्यूज नेटवर्कला फोनवरून सांगितलं की, 'लोखंडी पुलाचे काही भाग चोरल्याप्रकरणी आम्ही अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. पुल सुरक्षित ठेवण्यासाठी एक हवालदार तैनात केला आहे.'

First published:

Tags: Bihar, Crime news, Railway