पिंपरी, 20 मार्च: गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरात घरफोडीच्या (burglary in pipari chinchawad) अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरणं पसरलं होतं. सराईत भामटे बंद घराच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश करत होते. आणि घरातील मौल्यवान ऐवज लंपास करत होते. आता याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी या घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून सराईत भामटा अजित व्यंकप्पा पवार उर्फ लिंग्या पवारला सापळा रचून अटक केली आहे. याप्रकरणाची पुढील चौकशी पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने सापळा रचून 30 वर्षीय सराईत भामटा लिंग्या पवारला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी गेल्या चार दिवसांपासून वाळूज परिसरात वेश बदलून लिंग्या पवारचा तपास घेतला आहे. त्याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 12 लाख 78 हजार 450 रुपये किमतीचं 33 तोळं सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. लिंग्या पवार विरोधात मोस्ट वॉन्टेड आरोपी असून त्याने हिंजवडी, भोसरी, आळंदी, चाकण, देहूरोड अशा अनेक ठिकाणी बंद घरावर डल्ला मारला आहे. त्यामुळे येथील पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होते. दैनिक लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार, सराईत गुन्हेगार लिंग्या पवार घरोफोडी करुन चोरलेला सर्व मुद्देमाल एका स्थानिक व्यापाऱ्याला विकत होता. याप्रकरणी पोलिसांनी आता संबंधित व्यापाऱ्याच्याही मुसक्या आवळल्या आहेत. या व्यापाऱ्याचं नाव संदीप अंकुश केत असून तो सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील रहिवासी आहे. त्याला न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून इतर गुन्ह्यांचा महत्त्वपूर्ण खुलासा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. हे ही वाचा- चंद्रपूरमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, 6 लाखांची रोकड आणि 10 तोळे सोनं लंपास आरोपी लिंग्या पवार हा औरंगाबाद जिल्ह्यातील आपल्या नातेवाईकाकडे गेला असल्याची गुप्त माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी वेशांतर करून सलग चार दिवस आरोपीचा माग घेतला. त्यानंतर पोलिसांनी या सराईत भामट्याला पकडलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.