उल्हासनगर, 4 जून : एका दुचाकी चोराने आपण पकडले जाऊ नये म्हणून चक्क नदीत उडी टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र दुचाकी चोराने लढवलेली शक्कल अपयशी ठरली आणि या दुचाकी चोराला चक्क स्थानिक तरूणांनी नदीतून पकडून बाहेर काढल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला आहे. या चोराला सध्या पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. वडोल गाव परिसरातील वालधुनी नदीत हा प्रकार घडला आहे.
उल्हासनगर-अंबरनाथ शहराच्या सीमेवर साईबाबा मंदिराजवळ दुपारी दोन चोरटे एक दुचाकी चोरी करून पळत होते. याच वेळी ज्याची दुचाकी होती, ते दुसऱ्या एका दुचाकी वरून या चोरांचा पाठलाग करत त्यांच्या मागे मागे येत होते. दुचाकी चोर साईबाबा मंदिराजवळ आले असता त्यांचा तोल जाऊन त्यांची दुचाकी स्लिप झाली. त्यामुळे चोरीची ही दुचाकी तिथेच सोडून चोर पळून लागले. हे चोर पळत असताना तिथले अनेक स्थानिक तरुण या दोन चोरांच्या मागे पाठलाग करत धावत होते. त्यातील एका चोराला या तरुणांनी रस्त्यातच पकडलं. तर एका चोराने वालधुनी नदी उडी मारली. माता रमाबाई विद्यालयाच्या मागे असलेल्या नदीत उडी मारल्यानंतर हा चोर पोहत पोहत गुडराज टॉवर येथील ब्रिज खाली आला. त्यानंतर स्थानिक तीन ते चार तरुणाने नदीत उडी घेत नदीतून या चोरट्याला बाहेर काढले. या दोन्ही चोराना त्या तरुणाने उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
हे ही वाचा-पोलीस निरीक्षकानेच केला महिला पोलिसावर अत्याचार, घरी जाऊन केलं धक्कादायक कृत्य
आता पुढील कारवाई पोलीस करत आहेत. दरम्यान या चोरांनी चोरलेली दुचाकी साईबाबा मंदिर जवळ स्लिप झाल्यानंतर ते दुचाकी सोडून पळून गेले होते. मात्र त्यांच्या मागे येणारा दुचाकीच्या मालकाने आपली दुचाकी मिळतात, गाडीला किक मारली आणि पसार झाले. त्यामुळे आता याप्रकरणी दुचाकी चोर तर पोलिसांच्या ताब्यात आहेत, मात्र ज्यांची दुचाकी चोरीला गेली होती, त्यांचा ठावठिकाणा आता लागत नाही. त्यामुळे या दुचाकी मालकांच्या फिर्यादीनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस करण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Ulhasnagar news