सुनील घरत (ठाणे/ शहापूर), 06 एप्रिल : गर्भवती महिला रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार ठाणे जिल्ह्यातील शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उघडकीस आला आहे. गर्भवती महिलांच्या एका पाठोपाठ एक अशा एका दिवसात तब्बल 9सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचा पराक्रम येथील कंत्राटी तत्वावर असलेले स्त्री रोगतज्ञ डॉ. सुहास कदम यांनी केला आहे. विशेष म्हणजे काही अनावश्यक सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या गंभीर प्रकाराबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल जाधव यांनी डॉ. कदम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
शहापूर उपजिल्हारुग्णालयात ग्रामीण भागातून असंख्य रुग्ण, गर्भवती महिला येथे उपचारासाठी येत असतात. या गर्भवती महिलांवर तात्काळ उपचार व्हावे यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर स्त्री रोग तज्ञ, भुलतज्ञ यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी डॉ. कदम यांच्यासोबत सामंजस्य करार करून त्यांची शहापूर उपजिल्हारुग्णालयात स्त्री रोग तज्ञ म्हणून नेमणूक केली आहे.
3 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट, लग्नानंतर अंजली गावी आली आणि….यामध्ये डॉ. कदम यांनी करारानुसार सर्व रुग्णांची तपासणी व उपचार करणे क्रमप्राप्त असताना त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. तपासणीसाठी येणाऱ्या गर्भवती शस्त्रक्रिया विभागातील स्टाफ वेळेवर उपस्थित असताना त्यांच्या सिझेरियन शस्त्रक्रिया दुपारी करणे, प्रसूत वार्डात बेडची उपलब्धता व तयारी आहे की नाही याची शहानिशा न करता मनमानी शस्त्रक्रिया करीत असल्याचा ठपका डॉ. सुहास कदम यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
सोमवारी तीन एप्रिल ला डॉ. कदम यांनी एका पाठोपाठ एक अशा 9 महिलांच्या सिझेरियन शस्त्रक्रिया केल्याने गोंधळ उडाला. रुग्णालयीन स्टाफवर अतिरिक्त ताण पडल्याने ते त्रस्त झाले आहेत. याबाबत वारंवार सूचना देऊनही त्याकडे डॉ. कदम यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याने त्यांना वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल जाधव यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबत खुलासा न केल्यास प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
एका सिझेरियन शस्त्रक्रियेच्या रुग्णामागे किमान सहा हजार रुपये मिळत असल्याने अनावश्यक सिझेरियन शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत असून शस्त्रक्रियेनंतर संबंधित डॉक्टर कदम यांनी २४ तास रुग्णांवर देखरेख ठेवणे गरजेचे असताना या गंभीर रुग्णांना रामभरोसे सोडून ते रुग्णालयातून निघून जात असल्याने येथे गंभीर रुग्णांच्या जीवाशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आहे.
रुग्णालयात गर्भवती महिलांना ठेवण्यासाठी बेड कमी पडले असल्याने त्यांना खाली झोपवण्यात आले आहे तर वार्ड मध्ये ही जागा कमी पडल्याने स्टोर रूम मध्येते अन्य भेटेल त्या ठिकाणी महिलांना ठेवण्यात आले आहेत तर ज्या ठिकाणी रुग्णालयातील घान कचरा बाहेर फेकला जात आहे त्या ठिकाणी सुधा गर्भवती महिलांना खाली झोपवन्यात आले असल्याने गर्भवती महिलांना बाहेरील विषाणूचा संसर्ग होऊन आरोग्यस धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

)







