मुंबई, 2 नोव्हेंबर : कामाच्या ठिकाणी चांगलं वातावरण असेल, तर कामासाठी हुरूप येतो; मात्र सतत टोचून बोलणं, कामावरून किंवा खासगी गोष्टींवरून हिणवणं अशा गोष्टी कामाच्या ठिकाणी असणारा ताण वाढवतात. बॉस कसा आहे, यावरही त्या कर्मचाऱ्यांचा कामाचा दर्जा ठरत असतो. काही वेळा वरिष्ठांच्या सततच्या खोचक बोलण्यामुळे कामातला रस कमी होतो. काही वरिष्ठ तर कर्मचाऱ्यांवर सतत संशयही घेतात. मुंबईत बोरीवलीमध्ये तर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यावर चक्क घड्याळ फेकून मारल्याची घटना घडली आहे. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. ‘आज तक’ने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. मुंबईत बोरीवलीमध्ये एका हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या 30 वर्षीय आनंद सिंह याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. गेल्या वर्षापासून तो त्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीत सहयोगी क्लस्टर मॅनेजर पदावर काम करत होता. एका बँकेच्या हेल्थ इन्शुरन्स योजना विकण्याचं टार्गेट त्याला देण्यात आलं होतं. हे 5 लाख रुपयांचं टार्गेट तो सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे 9 ऑक्टोबरला त्याने त्याचे बॉस अमित सिंह (35 वर्षं) यांच्याकडे त्याचा राजीनामा दिला; मात्र अमित सिंह यांनी तो राजीनामा स्वीकारला नाही. अमित सिंह यांनी त्याला सकाळी साडेनऊ वाजता फोन करून ऑफिसमध्ये येण्यास सांगितलं. तसंच कामासंदर्भातले सर्व तपशील देण्यासही सांगितलं. यावर आपण आपलं उद्दिष्ट पूर्ण करू शकलो नसल्याचं आनंद यानं सांगितलं. तसंच संध्याकाळपर्यंत सर्व तपशील देऊ असंही सांगितलं. त्यानंतरही अमित सिंह यांचा एकदा फोन येऊन गेला; मात्र तो उचलता आला नाही, तर त्यांनी पुन्हा फोन करून शिव्या दिल्या व संध्याकाळी ऑफिसमध्ये येण्यास सांगितल्याचं आनंद सिंह यानं तक्रारीत म्हटलं आहे. संध्याकाळी ऑफिसमध्ये गेल्यावर दोघांमध्ये कामासंदर्भात बोलणं झालं. मीटिंग रूममध्ये बोलण्यास नकार दिल्यावर अमित सिंह यांचा तोल ढळला व त्यांनी टेबलवर असलेलं घड्याळ आनंदच्या डोक्यात मारलं. हेही वाचा - मोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून चाकूने भोसकले, हत्येचा LIVE VIDEO यामुळे त्या घड्याळाचे प्लास्टिकचे तुकडे आनंदच्या डोक्यात घुसले. डोक्यातून रक्त येऊ लागल्यानं सहकाऱ्यांनी आनंदला रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी ते प्लास्टिकचे तुकडे काढून तिथे टाके घातले. यानंतर आनंद सिंह यानं बोरीवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. महिन्याच्या 5 लाख रुपयांच्या टार्गेटच्या बदल्यात त्यानं दीड लाख रुपयांचा विमा विकला होता. त्यामुळे राजीनामा देण्याची तयारीही त्यानं दाखवली होती. मात्र, अमित सिंह यांनी राजीनामा न स्वीकारता शिव्या दिल्या व मारलं. अमित सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल करून घेतली असून, सध्या त्यांना अटक केलेली नाही. ‘कलम 41 नुसार आधी नोटीस पाठवून, मग त्यानुसार कारवाई करू,’ असं बोरीवली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.