सौरभ तिवारी, प्रतिनिधी बिलासपुर, 26 जून : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या तसेच खंडणीची मागणी, अशा अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या आईला एका तरुणासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. यानंतर त्या मुलाने या तरुणाला जबर मारहाण करत त्याची हत्या केली. गोवर्धन पाली उर्फ पिंटू (24) असे मृत तरुणाचे नाव आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - छत्तीसगड बिलासपुर येथील कोनी पोलीस ठाणे परिसरातील या घटनेप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. कोनी येथील रहिवासी गोवर्धन पाली याला बेदम मारहाण करुन त्याची हत्या करण्यात आली. यानंतर आरोपी फरार होण्याचा प्लान करत गुटकू रेल्वे स्टेशनवर पोहोचले होते आणि रेल्वेची वाट पाहत होते. दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी याप्रकरणी वेगाने तपास करत आरोपींना रेल्वे स्टेशनवरुन अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंगेली येथील गोवर्धन उर्फ पिंटू ठाकुरी हा जरहागांव येथील रहिवासी होता. त्याच्या वडिलांचे नाव सुखनंदन पाली असे आहे. गोवर्धन सध्या कोनी येथे राहत होता. तसेच त्याचे गावातीलच एका महिलेशी अनैतिक संबंध होते. बुधवारी रात्री गोवर्धन पाली याला आपल्या आईसह मुलाने पाहिले होते. यानंतर गोवर्धन हा आपला साथीदार सागर पाली आणि सूरज टंडन यांच्यासोबत रात्री 11 वाजता जेवण करून घरात झोपला होता. याचवेळी अजय (24), विजय (19), राजू (32), मुकेश (35), दिनेश आणि शेखर उर्फ विष्णू (20) घटनास्थळी पोहोचले. यानंतर त्यांनी अनैतिक संबंधाचे कारण देत गोवर्धन उर्फ पिंटू याला लाठ्या-काठ्या, रॉडने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळावरुन फरार झालेल्या आरोपींना अटक केली आहे. तसेच पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.