राहुल पाटील, पालघर, 18 मार्च : एखाद्या बंदी असणाऱ्या वस्तू किंवा पदार्थांची तस्करी करण्यासाठी तस्करांकडून वेगवेगळी शक्कल लढवण्यात येते. आता दारुच्या तस्करीसाठी चक्क अंड्यांचा वापर केल्याचं समोर आलं आहे. पुष्पा चित्रपटात चंदन तस्करीसाठी दुधाच्या टँकरचा वापर केल्याचं दाखवण्यात आलंय. अगदी तसंच इथे दारूच्या तस्करीसाठी नकली अंड्यांचा वापर केला गेला आहे. दमन बनावटीची दारू महाराष्ट्रात विक्री करण्यास बंदी आहे. नकली अंड्यांच्या आडून दारूची तस्करी केली जात होती. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलीय. पालघर उत्पादन शुल्क विभागाने दमन बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पालघर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मनोर वाडा रस्त्यावरील वाघोटे टोलनाक्यावर ही कारवाई केली असून यात तब्बल 18 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . विशेष म्हणजे ही दारूची तस्करी कोणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून टेम्पोमध्ये समोरच्या बाजूस पाचशे साठ बनावट प्लास्टिकच्या अंड्याचे ट्रे ठेवण्यात आले होते . या 560 अंड्यांच्या ट्रेमधून 16800 प्लास्टिकची बनावट अंडी देखील जप्त करण्यात आली आहेत . खाऊ देण्यासाठी लेकीला घेऊन गेला अन् दारुच्या नशेत केलं भयानक कृत्य दारूच्या तस्करी प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून टेम्पो चालकाला अटक करण्यात आलं आहे. तर आणखी एक जण फरार असून त्याचा शोध सध्या उत्पादन शुल्क विभाग घेत आहे. मात्र या कारवाईमुळे दारूसह वाहतूक होणारी ही प्लास्टिकची बनावट अंडी नेमकी कोणत्या भागात विक्रीस जात होती हे अजूनही स्पष्ट झालं नाही. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे . दरम्यान पालघर हा दादरा नगर हवेली आणि दमन या केंद्रशासित प्रदेशांच्या सीमेवर आहे. या भागातून मोठ्या प्रमाणावर या दोन्ही केंद्रशासित प्रदेशातील मद्य महाराष्ट्रात विक्रीस बंदी असताना सुद्धा चोरीच्या मार्गाने आणलं जात असल्याचं वारंवार उघड होतंय. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने आता या दारू माफियांवर करडी नजर ठेवली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.