नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : श्रद्धा वालकरच्या हत्येचे गूढ उकलण्यासाठी दिल्ली पोलीस उत्तराखंडपासून महाराष्ट्रात शोध घेत आहेत. एकीकडे दिल्ली पोलिसांचे पथक गुरुग्राममध्ये श्रद्धाचा खून करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करणाऱ्या आरोपी आफताबच्या संदर्भात शोधमोहीम राबवत आहेत. तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांचे पथकही डेहराडून आणि ऋषिकेशमध्ये आहे. आज वसईमध्ये दिल्ली पोलिसांनी श्रद्धाचे दोन मित्र राहुल रॉय आणि गॉडविन यांची चौकशी केली.
वास्तविक, पुराव्याच्या शोधात, दिल्ली पोलिसांचे एक पथक पुन्हा गुरुग्राममधील त्या ठिकाणी (आफताबचे जुने कार्यालय) पोहोचले आहे, जिथे पोलिसांनी काल शोध मोहीम राबवली होती. पोलिसांचे पथक आज मेटल डिटेक्टरसह पोहोचले आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यार आफताबने येथे लपवून ठेवल्याचा पोलिसांना संशय आहे. या हत्येचे गूढ उकलण्यापासून पोलीस कोसो दूर दिसत आहेत, कारण आजतागायत श्रद्धाचे शीर सापडलेले नाही, तसेच गुन्ह्यात वापरलेले हत्यारही मिळालेले नाही. दक्षिण दिल्लीतील अनेक पोलीस पथके अजूनही श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
दिल्ली पोलीस उत्तराखंडला रवाना
श्रद्धा हत्याकांडाच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांचे एक पथक उत्तराखंडला रवाना झाले आहे. हत्येचे गूढ उकलण्यासाठी दिल्ली पोलिसांनी डेहराडून पोलिसांशी संपर्क साधला आहे. मात्र, या काळात पोलिसांनी आफताबला उत्तराखंडला नेले नाही. आफताबच्या जबानीच्या आधारे पोलीस पथक डेहराडूनमध्ये तपास करणार आहे. एवढेच नाही तर श्रद्धा आणि आफताब जिथे थांबले होते त्या ऋषिकेशजवळील विशिष्ट गुहेचीही पोलीस चौकशी करणार आहेत.
राहुल रॉय यांची 3 तास चौकशी
श्रद्धा हत्याकांडप्रकरणी मृत तरुणीचे मित्र राहुल रॉय आणि गॉडविन यांची दिल्ली पोलिसांच्या पथकाने वसईत चौकशी केली आहे. राहुल रॉय यांची जवळपास 3 तास चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. श्रद्धा आणि आफताबच्या नात्याबाबत पोलिसांनी राहुलकडे चौकशी केली आहे. राहुलचे म्हणणे आहे की, त्याच्याकडे श्रद्धा आणि आफताबबद्दल जी काही माहिती होती, ती त्याने पोलिसांना सांगितली आहे. सध्या गॉडविनची चौकशी सुरू आहे.
दिल्ली पोलिसांचे उच्चपदस्थ अधिकारी आज सायंकाळपर्यंत वसईत
दिल्ली पोलिसांचे एक वरिष्ठ अधिकारी आज वसईला जात असून, ते श्रद्धा खून प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व करणार असून, महाराष्ट्रात गेलेल्या दिल्ली पोलिसांच्या पथकाला हे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळपर्यंत हे अधिकारी वसईत पोहोचतील, असे मानले जात आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा हत्येप्रकरणी आजपर्यंत श्रद्धाचे मित्र राहुल रॉय आणि गॉडविन यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय
श्रद्धा हत्याकांडानंतर महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महिला आयोग आणि महाराष्ट्र शासनाचे बालविकास मंत्रालय असे एक पथक तयार करणार आहे, जे घरातून पळून गेलेल्या मुलींबाबत कुटुंबाकडून तपशील घेतल्यानंतर मुलींशी संपर्क साधतील आणि त्यांना मदत आणि संरक्षण देत राहतील. महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभा लोढा यांनी ही माहिती दिली.
आफताबला 12 नोव्हेंबरला अटक
दिल्ली पोलिसांनी तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबला 12 नोव्हेंबरला श्रद्धा वालकरच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली होती. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनावाला याने 18 मे रोजी संध्याकाळी श्रद्धा वालकर (27) हिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले, जे त्याने दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या निवासस्थानी सुमारे तीन आठवडे 300 लिटरच्या फ्रीजमध्ये ठेवले. श्रद्धाचे शरीराच्या तुकड्यांची तो अनेक दिवस दिल्लीच्या विविध भागात विल्हेवाट लावत होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news