मुंबई, 30 नोव्हेंबर : श्रद्धा वालकर हत्याकांड उघड झाल्यापासून यात रोज काही ना काही अपडेट येत आहेत. आता आफताबची नवी गर्लफ्रेंड समोर आली आहे. आपला श्रद्धाच्या हत्येशी किंवा तिच्या तुकड्यांशी काहीही संबंध नसल्याचा दावा तिने केला आहे. तरुणीने सांगितले की, जेव्हा ती आफताबच्या घरी त्याला भेटायला यायची तेव्हा आफताबने या घरात श्रद्धाचे तुकडे ठेवले होते याची तिला कल्पना नव्हती.
मे महिन्यात श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने या नवीन मुलीला डेट करायला सुरुवात केली. दोघांची भेट त्याच बंबल अॅपवर झाली ज्याद्वारे श्रद्धा आणि आफताब यांची भेट झाली. ही नवीन मैत्रीण ऑक्टोबरमध्ये दोनदा आफताबच्या घरी आली होती. 12 ऑक्टोबरला आफताबने तिला अंगठी दिल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिच्याकडून ही अंगठी जप्त केली असून तिचा जबाब नोंदवला आहे.
कोण आहे? आफताबची नवीन गर्लफ्रेंड?
वृत्तानुसार, पोलीस तपासात असे समोर आले आहे की, श्रद्धाच्या हत्येनंतर 12 दिवसांनी दोघे 30 मे रोजी संपर्कात आले होते. आफताबची नवी गर्लफ्रेंड मानसोपचारतज्ज्ञ आहे. तिने पोलिसांना सांगितले की, ती ऑक्टोबरमध्ये दोनदा आफताबच्या घरी आली होती, पण तिला कधीच वाटले नाही की या घरात कोणीतरी खून केला आहे किंवा मानवी शरीराचे तुकडे इथे ठेवले आहेत. आफताबच्या चेहऱ्यावर कधीही भिती दिसली नाही, असेही तिने सांगितले.
आफताब खुलासा
तरुणीने सांगितले की, तिला आफताबचे वागणे नेहमीच सामान्य वाटत होते. तो खूप केअरिंग नेचरचा होता, त्यामुळे आफताबची मानसिक स्थिती ठीक नाही असे तिला कधीच वाटले नाही. तिने सांगितले की आफताबकडे विविध प्रकारचे डिओडोरंट्स आणि परफ्यूम्सचा संग्रह होता आणि तो तिला अनेकदा परफ्यूम भेट देत असे. आफताब खूप धूम्रपान करायचा असंही तिने सांगितले. तिने असेही सांगितले की आफताबला विविध प्रकारचे पदार्थ खाण्याची आवड होती आणि तो वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधून मांसाहारी पदार्थ ऑर्डर करत असे.
आफताबला 12 नोव्हेंबरला अटक
दिल्ली पोलिसांनी तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबला 12 नोव्हेंबरला श्रद्धा वालकरच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली होती. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनावाला याने 18 मे रोजी संध्याकाळी श्रद्धा वालकर (27) हिचा खून केला आणि तिच्या मृतदेहाचे 36 तुकडे केले, जे त्याने दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या निवासस्थानी सुमारे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले होते. तो अनेक दिवस दिल्लीच्या विविध भागात तिचे तुकडे फेकून देत होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news