पाकिस्तान, 7 एप्रिल : पबजीचं व्यसन जगभरातील गेमर्ससाठी धोकादायक ठरत आहे. या प्रसिद्ध गेम्सची सवय इतकी धोकादायक ठरत आहे की, अनेक घटनांमध्ये गेमर्स लोकांचा जीव घेण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. या गेममुळे पाकिस्तानात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाकिस्तानातील लाहोरमध्ये एका व्यक्तीला पबजी खेळाचं इतकं व्यसन लागलं होतं की, त्याने कुटुंबावरच गेमप्रमाणे गोळीबार केला. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत.
AryNews च्या रिपोर्टनुसार सोमवारी लाहोरच्या नावा कोटजवळ एका व्यक्तीने या गेममधील एक दृश्य रीक्रिएट केलं, ज्याचा सीसीटीव्ही फुटेज जलद गतीने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती पबजीचा हेल्मेट आणि जॅकेट घालून गोळीबार करीत असल्याचं दिसत आहे. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितलं की, घरगुती प्रकरणात त्या व्यक्तीचा घरातील सदस्यांसोबत वाद झाला. ज्यानंतर त्याने गोळीबार केला.
भागात गोळीबाराचा आवाज आल्यानंतर नागरिकांना हा प्रकार कळाला. त्यांनी आरोपीला पकडलं आणि त्याला पोलिसांकडे सोपवलं. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज यूट्यूबवर शेअर करण्यात आला असून यामध्ये एक व्यक्ती गोळ्या झाडत असल्याचं दिसत आहे. या घटनेत आरोपीची वहिनी आणि मित्राचा मृत्यू झाला आहे. तर आई, बहिण, भाऊ गंभीर जखमी झाले आहेत.
हे ही वाचा-बुरखा घाला,बलात्कार कमी होतील'; अजब सल्ल्यानंतर पाक पंतप्रधान बेदम ट्रोल
पोलिसांनी या गोळीबाराबद्दल माहिती देताना सांगितलं की, आरोपीला पबजी खेळाचं व्यसन होतं. त्यामुळे घरातील सदस्य त्याला हा गेम खेळण्यापासून रोखत असे. त्या दिवशी आरोपी यावर चिडला आणि त्याने पबजीचा एक सीन रिक्रिएट केला. यादरम्यान कुटुंबासोबत वाद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो बंदुक घेऊ आला व त्याने सर्वांवर गोळ्या झाडल्या.