उदयपूर, 26 डिसेंबर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona pendemic) आणि लॉकडाऊन (Lockdown) यामुळे देशातील अनेकांच्या नोकऱ्या (Jobs) गेल्या आहेत. तसेच अनेकांना त्यांच्या व्यवसायात प्रचंड तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे काहीजण कर्जबाजारीही झाले आहेत. हे चित्र साधारणतः अनेक ठिकाणी दिसत आहे. हातावर पोट असणाऱ्या कामगारांची तर अवस्था अधिकच बिकट झाली आहे. अशातच एका व्यक्तीनं आर्थिक तंगीला कंटाळून आपल्या बायकोची आणि चार मुलांची हत्या केली आहे आणि त्यानंतर स्वतः ही आत्महत्या करून जीव दिला आहे.
ही घटना उदयपूर येथील आहे. खेरवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या रोबिया गावातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीची आणि चार मुलांची हत्या केल्यानंतर स्वतः आत्महत्या केली आहे. अचानक हा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उशीरा घडली असून सकाळी काही गावकऱ्यांना संबंधित व्यक्तीचा मृतदेह दिसल्यानंतर ही घटना समोर आली. ग्रामस्थांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री पती-पत्नीमध्ये कशावरून तरी कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यानंतर संतप्त पतीनं आपल्या पत्नीची आणि चार मुलांची धारदार शस्त्राने हत्या केली आहे. यामध्ये दोन मुली आणि दोन मुलं होती. कुटुंबातील पाच सदस्यांची हत्या केल्यानंतर या युवकानं स्वत: झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेचं अधिकृत कारण अजून समजलेलं नाही. त्यामुळं पोलिसांनी अधिक तपासासाठी पुरावे गोळा करण्यासाठी एफएसएलला बोलावलं आहे. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
रोबिया गावातील लोकांनी एका झाडावर युवकाचा लटकलेला मृतदेह पाहिल्यानंतर त्यांना संबंधित घटनेची माहिती मिळाली. या घटनेची माहिती देण्यासाठी ही लोकं मृत युवकाच्या घरी पोहोचले तेव्हा त्याच्या घराला बाहेरून एक कुलूप लावलं होतं. पण घराबाहेर रक्ताचे सुखलेले डाग स्पष्टपणे दिसत होते. त्यानंतर ग्रामस्थांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घराचं कुलुप तोडलं. पोलिसांनी घरात प्रवेश केल्यानंतर घरातील चित्र खूपच हृदयद्रावक होतं. घराच्या आत आत्महत्या केलेल्या युवकाची पत्नी आणि चार निष्पाप मुलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांची एका धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या युवकांनं आर्थिक तंगीमुळे या हत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र याचं खरं कारण अद्याप समोर आलं नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.