मुंबई, 26 ऑक्टोबर- एखादी व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेला, आणि त्याला ते व्यसन करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याचा राग अनावर होतो, हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. अनेकदा यातून मोठा वादही होता. मध्य प्रदेशमध्ये तर एक खूपच धक्कादायक प्रकार घडलाय. पेट्रोल पंपावर आलेल्या ग्राहकाला सिगारेट ओढू न दिल्यानं पेट्रोल पंप कर्मचाऱ्याची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आलीय. सोमवार (24 ऑक्टोबर 2022) रोजी मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात ही घटना घडली असून यात पंपावरील आणखी एक कर्मचारी गंभीर जखमी झालाय. पेट्रोल पंपावर धूम्रपान करण्यास नकार दिल्यानं पाच संतप्त तरुणांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याची हत्या केली. या हल्ल्यात एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी इंदूरला नेण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. तसेच आरोपींच्या घराचे बांधकाम अनधिकृत असून ते पाडण्याची प्रक्रिया सुद्धा प्रशासनानं सुरू केली आहे. **(हे वाचा:** एकमेकांकडे पाहण्यावरुन झालं भांडण, मुंबईत तिघांचे तरुणासोबत भयानक कांड ) पोलिस म्हणतात… अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनजीतसिंग चावला यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, ‘पेट्रोल पंपावरील मारहाणीत जोहानसिंग राजपूत व राहुल सिंग हे दोन कर्मचारी जखमी झाले होते. जखमी जोहानचा रुग्णालयात मृत्यू झाला, तर राहुलला उपचारांसाठी इंदूरला नेण्यात आलं आहे. प्रशासनानं आता या प्रकरणातील आरोपींची घरं अनाधिकृत असल्यानं पाडण्याची तयारी केली आहे. आरोपींची घरं अनधिकृतपणे बांधण्यात आली होती.’ विशेष म्हणजे मध्य प्रदेशात गुन्हेगार आणि बदमाशांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी सरकार अशा स्वरुपाची कारवाई करीत आहे. पेट्रोल पंपावर नेमकं काय घडलं? भोपाळ रोडवरील जेतपुराजवळील सूर्यांश सेल्स पेट्रोल पंपावर ही घटना घडल्याचं एका पोलीस अधिकाऱ्यानं काल, मंगळवारी (25 ऑक्टोबर 2022) रात्री सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच तरुण त्यांच्या कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आले होते. त्यापैकी एकानं सिगारेट पेटवली, त्यावर राहुल सिंग नावाच्या कर्मचाऱ्यानं त्याला सिगारेट ओढू नको, असं सांगितलं. यामुळे संबंधित पाच जण संतप्त झाले, आणि त्यांनी राहुल यांच्याशी भांडण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी पेट्रोल पंपावर असणारा दुसरा कर्मचारी जोहानसिंग राजपूत यानी मध्यस्थी केली, तेव्हा आरोपींनी दोन्ही कर्मचाऱ्यांवर चाकूनं वार केले. यामध्ये जोहानसिंग यांचा मृत्यू झाला.या घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करीत आरोपींना अटक केली आहे. मात्र, याप्रकारानंतर मध्य प्रदेशातील देवास जिल्हा हादरला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.