धक्कादायक! दोन टी शर्ट चोरले म्हणून तब्बल 20 वर्षांचा तुरुंगवास

धक्कादायक! दोन टी शर्ट चोरले म्हणून तब्बल 20 वर्षांचा तुरुंगवास

धक्कादायक म्हणजे 20 वर्ष तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्याची आई, पत्नी, मुलगा आणि दोन भाऊ या सगळ्यांचा मृत्यू झाला.

  • Share this:

पुरोगामी, व्यक्तीस्वातंत्र्य, आधुनिकता यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अमेरिकेत आजही वर्णभेद खोलवर रुजलेला आहे. अगदी आतापर्यंत अमेरिकेतील काही प्रांतामध्ये गोरे आणि काळे यांच्यात भेद करणारे अनेक कायदे अस्तित्वात होते. याचीच प्रचिती देणारं एक उदाहरण नुकतंच समोर आलं आहे. अमेरिकेतील लुसियाना (Louisiana) राज्यातील एका आफ्रिकन व्यक्तीला केवळ दोन टी शर्ट चोरल्याबद्दल तब्बल वीस वर्षे तुरुंगात खितपत पडावे लागले आहे. नुकतीच या 67 वर्षांच्या एका गृहस्थाची तुरुंगातून सुटका झाली. गाय फ्रँकअसं या दुर्दैवी व्यक्तीचं नाव आहे.

सप्टेंबर 2000 मध्ये न्यू ऑर्लिन्स (New Orleans) शहरातील साक्स फिफ्थ एव्हेन्यू (Saks Fifth Avenue) या दुकानातून दोन टी शर्ट चोरताना फ्रँकला पकडण्यात आलं होतं. त्यानं चोरलेले टी शर्टस दुकानाला परत करण्यात आले. पण त्यावेळी लुसियानातील कायद्यानुसार अगदी 500 डॉलर्सपेक्षाही कमी किंमतीच्या चोरीलादेखील गंभीर गुन्हा मानला जात होता. त्यामुळे फ्रँक याला वीस वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. लुसियानातील थ्री-स्ट्राइक (Three Strike Laws) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतिशय कठोर कायद्यामुळे पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड असेल तर अशा गुन्हेगारांना अत्यंत कठोर शिक्षा दिली जात असे. गाय फ्रँक याला 1975 पासून चोरी,कोकेन जवळ बाळगणे अशा विविध गुन्ह्यांसाठी 36 वेळा अटक झाली होती. 1990 मध्ये त्याला तीन वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली होती. पण त्या खटल्यात त्याच्यावर कोणते आरोप ठेवण्यात आले होते ते अद्याप अस्पष्ट आहे. गाय फ्रँकच्या या पूर्व इतिहासामुळे त्याच्या या चोरीच्या गुन्ह्यासाठी त्याला इतकी कठोर शिक्षा सुनावण्यात आली.

हे ही वाचा-फाशीतून बचावली तर पत्नीला दिले इस्त्रीचे चटके, बाईकसाठी पतीचं राक्षसी कृत्य

सर्वाधिक कैदी असलेला देशातील एकमेव प्रांत अशी लुसियानाची ओळख आहे. पुनर्वसन किंवा गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी इथं फक्त शिक्षेवरच लक्ष केंद्रित करणाऱ्या कायद्यांमुळे वंशभेदाला खतपाणी घातलं जात होतं. तसंच मोठ्या प्रमाणात लोकांना तुरूंगवास घडत होता. या कायद्यांविरुद्ध जोरदार निषेध व्यक्त होऊ लागल्यानं अखेर 2017 मध्ये थ्री स्ट्राईक कायदा मोडीत निघाला. पण काळे आणि गोरे असा वर्णभेद करणारे वास्तव बदलले नाही.

न्यू ऑर्लिन्समधील दी इनोसन्स प्रोजेक्ट (The Innocence Project) या सेवाभावी संस्थेनं आपल्या अनजस्ट पनिशमेंट या प्रोजेक्टअंतर्गत फ्रँकच्या सुटकेसाठी त्याला गुन्ह्याच्या तुलनेत देण्यात आलेल्या अतिकठोर शिक्षेविरुद्ध मोहीम सुरू केली. फ्रँकच्या खटल्यावरून गरीब काळ्या लोकांबाबत शिक्षेबाबत भेदभाव केला जात असल्याचं स्पष्ट होतं. याच प्रकारच्या गुन्ह्यासाठी सधन गोऱ्या व्यक्तीला किती शिक्षा होऊ शकते याची काहीही कल्पना करता येत नाही. असं या संस्थेनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

ल्युसियानातील सर्वोच्च न्यायालयातील माजी सर न्यायाधीश बेर्नेटे जॉन्सन यांनीदेखील ल्युसियानातील हे कायदे काळ्या लोकांना गरीबीत खितपत ठेवण्यासाठीच बनवण्यात आल्याचं मत व्यक्त केलं होतं,असं दी वॉशिंग्टन पोस्टनं म्हटलं आहे. जॉन्सन यांनी हे‘पिग लॉज’असून,यामुळे गुलामगिरीतून सुटका झालेल्या गरीब आफ्रिकन अमेरिकन्सना मजूर बनवण्यासाठी भाग पाडण्याचे अधिकार राज्यांना मिळाले आहेत असंही म्हटलं होतं. जुन्या कायद्यानुसार टी शर्ट चोरण्याचा फ्रँकचा चौथा गुन्हा होता. त्यामुळे त्याला न्यायालय 23 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षादेखील करू शकते. त्याच्यापासून कोणालाही धोका नसताना त्याला त्याच्या छोट्याशा गुन्ह्यासाठी फार मोठी शिक्षा मिळाली असल्याचं दी इनोसन्स प्रोजेक्ट या सेवाभावी संस्थेनं म्हटलं आहे.

फ्रँक 20 वर्ष तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्याची आई, पत्नी, मुलगा आणि दोन भाऊ या सगळ्यांचा मृत्यू झाला. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर फ्रँकला उदरनिर्वाह करता यावा यासाठी गो फंड मी मोहीम राबवण्यात येत आहे.

First published: April 16, 2021, 1:21 PM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या