नवी दिल्ली, 03 फेब्रुवारी : शीना बोरा हत्याकांडाला नवीन वळण मिळालं आहे. या प्रकरणातली आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जीनं, आपली मुलगी जिवंत असल्याचा दावा केला आहे. इंद्राणीच्या दोन वकिलांनी गुवाहाटी विमानतळावर शीनासारखी दिसणारी मुलगी बघितल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे, गुवाहाटी विमानतळ प्राधिकरणाने गुरुवारी (2 फेब्रुवारी) विशेष सीबीआय न्यायालयात 5 जानेवारी 2023 या दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज सादर केलं आहे. विमानतळावरच्या सुरक्षा तपासणीचं फुटेज असलेली एक सीडी सीलबंद लिफाफ्यात न्यायालयात जमा करण्यात आली. इंद्राणीने त्याची एक प्रत मागितली आहे. 'हिंदुस्तान टाइम्स'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
मुलीच्या हत्येचा आरोप असलेल्या आयएनएक्स मीडियाच्या सीईओ इंद्राणी मुखर्जीने शीना जिवंत असल्याचं म्हणत न्यायालयात चौकशीसाठी एक अर्ज दाखल केला होता. इंद्राणीचे प्रतिनिधित्व करणारे वकील रणजित सांगळे यांनी दावा केला होता की, एक वकील शीनाला 2007पासून ओळखत होते.
हे ही वाचा : जवळच्या मित्रांनीच दिला दगा, अल्पवयीन मुलीसोबत केलं धक्कादायक कृत्य
तिने त्यांच्याद्वारे शूट केलेल्या व्हिडिओसह शपथपत्रदेखील दाखल केले होते. त्यामुळे न्यायालयानं 'या' महिलेची ओळख पटवून देण्यास तपास एजन्सीला सांगावं, अशी विनंती सांगळे यांनी केली होती. त्यानंतर, 12 जानेवारी रोजी न्यायालयानं विमानतळ प्राधिकरणाला 5 जानेवारीचं सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे निर्देश दिले होते.
सीबीआयनं याबाबत म्हटलं होतं की, रेकॉर्डवरचे पुरावे पाहता शीना जिवंत असणं हे अशक्य आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, "शीनाचा मृत्यू झाल्याचं पुराव्याच्या आधारे सिद्ध झालेलं आहे. तिला अर्जदार आरोपी आणि इतरांनी मारलं आहे. त्यामुळे आता आरोपी किंवा अॅडव्होकेट सवीना टी. बेदी यांनी केलेल्या शीना जिवंत असल्याच्या दाव्यात तथ्य नाही. ही न्यायालयाची चेष्टा आहे. शिवाय, तपासादरम्यान सापडलेला सांगाडा शीनाचाच होता हे डीएनए अहवालात सिद्ध झालेलं आहे."
शीना जिवंत असल्याचा दावा करत इंद्राणीनं आपला बचाव करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला आहे. हे बघता विमानतळावर दिसलेली ती महिला शीना आहे की नाही हे तपासण्यात कोणतीही हानी नसल्याचं सांगून न्यायालयाने इंद्राणीची याचिका मंजूर केली होती.
हे ही वाचा : स्वत:च्या मृत्यूचा बनाव; वर्षभर पोलिसांना फसवलं, अखेर सत्य आलं समोर, पुणे पोलिसांची कारवाई
या प्रकरणातली आरोपी इंद्राणी तिचा पूर्वीचा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय यांनी शीनाचा खून केला होता. शीना ही इंद्राणीची पहिल्या पतीपासून झालेली मुलगी होती. तीन आरोपींनी 24 एप्रिल 2012 रोजी मुंबईत एका कारमध्ये शीनाचा गळा दाबून खून केला होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी तिचा मृतदेह रायगड जिल्ह्यात गागोदे गावाच्या जंगलात फेकून दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.