भिवंडी, 27 ऑक्टोबर : मुंबई नाशिक महामार्गावर राजनोली नाका आणि भिवंडी कल्याण रोड या परिसरात कोनगाव पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणावर लॉजिंग व्यवसाय फोफावला आहे. या परिसरातील 'शेर ए पंजाब' या लॉजवर ठाणे अनैतिक मानवी तस्करी पथकाने कारवाई करत तीन तरुणींची सुटका केली आहे. तसंच याप्रकरणी दोन दलालांविरोधात कारवाई सुरू केली आहे.
सरवली ग्रामपंचायत हद्दीत शेर ए पंजाब बार अँड लॉज असून या ठिकाणी महिलांकडून अनैतिक शारीरिक व्यवसाय करून घेतला जात असल्याची उघड झाली. याबाबत अनैतिक मानवी तस्करी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांना खबर मिळाली. त्यानंतर या लॉजवरील महिला पुरवणाऱ्या दलालांशी संपर्क साधून महिला पुरविण्याची मागणी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून करण्यात आली.
मंगळवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास दोन दलाल तीन बळीत महिलांना घेऊन त्या ठिकाणी आले असता पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल मदने ,पो उप निरी चव्हाणके ,पो हवा बाबरेकर , हवाळ, सोनवणे या पोलीस कर्मचाऱ्यांनी दोघा दलालांना रंगेहात पकडले असून त्यांच्या तावडीतून तीन बळीत महिलांची सुटका केली आहे.
याप्रकरणी दोन दलालांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून बळीत महिलांची रवानगी महिला सुधारगृहात केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी दिली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वेश्या व्यवसायाचं प्रमाण वाढलं असून अनेक ठिकाणी संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे.