अहमदनगर, 30 जुलै : सुरक्षा रक्षकाकडून अचानक बंदुकीची गोळी सुटल्याने बँकेत कामानिमित्त आलेल्या एका ग्राहकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे घडली आहे. गोळी संबंधित इसमाच्या डोक्यातून थेट आरपार गेल्याने घटनास्थळी रक्ताचा अक्षरशः सडा पडला होता. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे. श्रीरामपूर येथील अशोक बँकेचे कर्मचारी भरणा भरण्यासाठी शहरातील शिवाजी रोडवरील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेत आले होते. अशोक बँकेचे सुरक्षा रक्षक दशरथ पूजारी हे देखील त्यांच्या समवेत होते. त्याच दरम्यान जिल्हा बँकेच्या शाखेत श्रीरामपूर शहरातील अजित जोशी हे कामानिमित्त आले होते. आपले काम आटोपून ते पार्किंगमध्ये आपली गाडी काढत असताना अशोक बँकेचे सुरक्षा रक्षक दशरथ पुजारी यांच्याकडील लोड असलेल्या बंदुकीतून अचानकपणे गोळी सुटून ती जोशी यांच्या डोक्यातून आरपार झाली. गोळीबाराचा आवाज झाल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी घटना स्थळाकडे धाव घेतली. रुग्णवाहिका बोलावून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अजित जोशी यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात हलवत आले. मात्र गोळी थेट डोक्यातून आरपार झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूरचे पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप हे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. ज्या सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून गोळी सुटून जोशी यांचा मृत्यू झाला त्या दशरथ पुजारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनास्थळाचा पंचनामा करुन पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.