अहमदनगर, 23 डिसेंबर : 25 डिसेंबरला संपूर्ण जगात ख्रिसमस हा सण उत्साहात साजरा केला जातो. भारतातही मोठ्या प्रमाणात ख्रिसमसची तयारी केली जात आहे. ख्रिश्चन धर्मीयांसाठी हा खूप महत्त्वाचा सण आहे. असं असतानाच गुजरातमधील बडोद्यात मात्र एका सांताक्लॉजला लोकांनी बेदम मारहाण केली आहे. या बाबतचं वृत्त ’ लाइव्ह हिंदुस्थान’ने दिलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बडोदा येथील मरकपूरमध्ये एका कॉलनीत एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. ही व्यक्ती सांताक्लॉजच्या वेशभूषेत त्या कॉलनीतील ख्रिश्चन समुदायाला भेटण्यासाठी गेली होती. त्या कॉलनीमध्ये केवळ ख्रिश्चन धर्माचे लोक राहत नाहीत तर इतर धर्मीय लोकंदेखील राहतात. तो सांताक्लॉज त्या कॉलनीत गेल्यानंतर मुलांना चॉकलेट वाटत होता. सांताक्लॉजची ही कृती त्या कॉलनीतील इतर धर्मीय लोकांना आवडली नाही. त्यांनी त्या सांताक्लॉजला भेदम मारहाण केली. त्यात ती सांताक्लॉजच्या वेशभूषेतील व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. ‘आज तक’च्या रिपोर्टनुसार या घटनेत एकूण चार लोक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. घरात रात्रभर दारूची पार्टी, पण सकाळी बायकोचं नवऱ्यासोबत भयानक कृत्य या घटनेत सांताक्लॉज चॉकलेट वाटत असताना त्याला इतर धर्मीयांनी पाहिलं. त्यांनी त्या सांताक्लॉजला आपली वेशभूषा काढण्यास सांगितली. त्याने त्यास नकार दिल्याने त्यास मारहाण केली. या घटनेनंतर ख्रिश्चन धर्मीयांनी असा आरोप केला आहे की, त्यांना एका विशिष्ट धर्माच्या लोकांनी अशी धमकी दिली आहे की, “हा त्यांचा परिसर असून, इथे असे काही चालणार नाही.” या घटनेची तक्रार दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या घटनेनंतर दोन वेगवेगळ्या धर्मियांमध्ये वाद निर्माण झाला आहे. या घटनेनंतर ख्रिश्चन धर्मियांनी पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ख्रिसमसच्या दिवशी मिरवणूक काढायची आहे, त्यासाठी ख्रिश्चन धर्मियांनी सुरक्षेची मागणी केली असून ती पोलीसांकडून मान्य करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या घटना विविधतेने नटलेल्या आपल्या देशात घडायला नकोत. पण काही मूठभर वाईट मानसिकतेचे लोकं अशी कृत्यं करतात व सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतात. सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या आपल्या देशात एकमेकांच्या धर्माप्रती आदर असणं अत्यंत आवश्यक आहे. सामाजिक सलोखा व बंधूभाव टिकून राहण्यासाठी ते गरजेचेदेखील आहे. मूठभर वाईट मानसिकतेच्या लोकांनी धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न जरी केला तरी इतरांनी मात्र सामंजस्य दाखवायला हवं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.