हरिकांत शर्मा, प्रतिनिधी आगरा, 17 जून : देशात दिवसेंदिवस चोरीच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने तिच्या प्रियकराच्या मदतीने तिच्या सख्ख्या मावशीच्या घरी चोरी केल्याचा कट रचला आणि त्यानुसार, तब्बल 70 लाखांची चोरी केली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तर पोलिसांनी प्रेयसी, प्रियकर तसेच या चोरीत सहभागी असलेल्या प्रियकराच्या मित्राला अटक केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - ही घटना ते आग्राच्या शहागंज पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या शिवाजी नगर येथील आहे. 10 जून रोजी बुटाचे व्यापारी मुन्नालाल यांच्या घरातून लाखो रुपयांची चोरी झाली होती. त्याने पोलिसांना सांगितले की, 10 जून रोजी तो त्याच्या लहान मुलासोबत दुकानात होता आणि मोठा मुलगा त्याच्या पत्नीला डॉक्टरकडे घेऊन गेला होता. घरात व्यावसायिकाची पत्नी सीमा, वृद्ध आई आणि मेहुणीची मुलगी पूजा या घरात होते. याचदरम्यान, चोरट्यांनी घरातून सुमारे 20 लाख रुपयांची रोकड आणि 50 लाख रुपयांचे दागिने चोरून नेले.
तर चोरी झाल्याचे समोर येताच एकच खळबळ उडाली. यानंतर चोरीची माहिती पोलिसांना देण्यात आली. फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले. पोलिसांनी घराच्या आजूबाजूला लावलेले सीसीटीव्हीही तपासले. मात्र, कोणताही सुगावा लागला नाही. अशा स्थितीत घरातीलच कोणीतरी या चोरीत सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आला. मात्र, आपल्या सख्ख्या मावशीच्या घरी राहणारी पूजा हीच चोरीच्या घटनेची सूत्रधार असल्याचे कुटुंबीयांना फारसे माहीत नव्हते. पोलिसांनी घरातील सर्व सदस्यांची एक एक करून चौकशी केली. चौकशीदरम्यान चपला व्यापाऱ्याच्या मेहुणीची मुलगी पूजा हिनेही पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तिच्या बोलण्यातून विरोधाभास दिसून आला आणि येथून पोलिसांना पूजावर संशय आला. पोलिसांनी कडक चौकशी केली असता संपूर्ण रहस्य उघड झाले. पूजाचा प्रियकर आकाश रावत आणि तिचा मित्र चेतन रावत हे दोघेही मथुराचे रहिवासी आहेत. चोरीची घटना घडवून आणण्यासाठी दोघेही लोडिंग टेम्पो घेऊन चपला व्यापाऱ्याच्या घरी पोहोचले होते. प्रेयसीने घराचा मागचा दरवाजा उघडला होता, जेणेकरून तो घरात सहज घुसखोरी करू शकतो आणि चोरी करुन पळू शकतो. सर्व काही नियोजनानुसार झाले आणि प्रेयसीसह तिच्या प्रियकर आणि मित्राने चोरीची घटना घडवून आणली. चोरीच्या घटनेत आपल्या मुलीचाच सहभाग असल्याचे कुटुंबीयांना समजताच मावशीच्या पायाखालची जमीनच सरकली. या खुलाशानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना तुरुंगात पाठवण्याची तयारी केली आहे. या घटनेची परिसरात मोठी चर्चा होत आहे.