रहमान, प्रतिनिधी बस्ती, 8 जून : एका अल्पवयीन मुलीसोबत दुष्कर्म करुन तिची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कुंदन सिंग, राजन साहनी, मोनू साहनी या तीन नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये, बस्ती जिल्ह्यातील गौर पोलीस स्टेशन परिसरात घडली. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मुलीवर ज्या पद्धतीने अत्याचार करण्यात आला ते वाचून तुम्हाला धक्का बसेल. नराधमांनी मुलीचे अपहरण करुन तिला घराच्या खोलीत नेले आणि तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सामूहिक बलात्काराच्या वेळी अतिरक्तस्त्राव झाल्याने अल्पवयीन पीडिता कोमात गेली. कोमात गेल्यावरही जनावरे त्या निष्पाप मुलीसोबत दुष्कर्म करत राहिले. इतकेच नव्हे तर तिचा मृत्यू होईपर्यंत या 12 वर्षांच्यावर चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला.
अल्पवयीन मुलगी घरून भाजी आणण्यासाठी जात होती - सोमवारी सायंकाळी 4 ते 5 या वेळेत ही मुलगी घरातून भाजी घेण्यासाठी बाहेर पडली होती. त्याचवेळी आरोपी कुंदन सिंगच्या घराजवळून मुलीचे अपहरण करून एका खोलीत नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तसेच मुलीचा मृत्यू झाल्यावर त्यांनी तिचा मृतदेह घराच्या मागे टाकून पळ काढला. रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी न पोहोचल्याने कोणीतरी फोनवरून मुलीची माहिती दिली. यानंतर कुटुंबीय पोहोचले तेव्हा त्यांना पाहून धक्काच बसला. त्यांची मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. आजूबाजूला पाहिलं तर कुंदन सिंगच्या घराच्या दरवाजावर आणि पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्या होत्या. नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी तिघा आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेच्या रात्री मोनू साहनी याला अटक केली. मंगळवारी दुसऱ्या दिवशी राजन साहनी याला पोलिसांनी अटक केली. मात्र, तिसरा आरोपी कुंदन सिंग याला अटक झालेली नव्हती. तिसऱ्या आरोपीच्या अटकेसाठी मंगळवारी मुलीचे शवविच्छेदन झाल्यानंतर कुटुंबीय धरणे धरून बसले. प्रशासनाच्या आश्वासनाने आंदोलन संपले असले तरी मुलीचा अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकांनी नकार दिला. तिसऱ्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तैनात केली. अखेर यानंतर तिसऱ्या आरोपी कुंदन सिंगलाही पोलिसांनी अटक केली. यानुसार गँगरेप आणि हत्येच्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे. या घटनेने परिसर हादरला आहे.