बंगळुरू, 17 मार्च : एका कथित सेक्स सीडी (Sex CD) प्रकरणामुळे कर्नाटकातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. या प्रकरणामुळे कर्नाटकचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi) यांना राजीनामा द्यावा लागला. एका महिलेला सरकारी नोकरीचं आमिष देवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यावर लावला होता. त्यांचा हा संबंधित व्हिडीओ काही कन्नड भाषिक वृत्तवाहिन्यांनी चालवला होता. त्यामुळे कर्नाटक सरकारची चांगलीच नाचक्की झाली होती. आता या प्रकरणाला एक वेगळं वळणं लागलं. या प्रकरणातील संबंधित महिलेचं अपहरण झालं असल्याचा दावा पिडितेच्या आई वडिलांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिडित महिलेच्या आई वडिलांनी बुधवारी बेळगाव पोलीस ठाण्यात आपल्या मुलीचं अपहरण (Victim Kidnapped) झालं असल्याची तक्रार दाखल केली आहे. तसंच आपला जीव धोक्यात असल्याची माहितीही त्यांनी पोलिसांना दिली आहे. त्यामुळे जारकीहोळी यांच्या राजीनाम्यानंतर शांत झालेलं प्रकरणं पुन्हा पेटताना दिसताना आहे.
17 मार्च रोजी बेपत्ता महिलेच्या पालकांनी बेळगाव पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. तसंच आपल्या जीवालाही धोका असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 2 मार्च रोजी आपल्या मुलीचं अपहरण झालं असल्याचा दावा पीडित मुलीच्या वडिलांनी केला आहे. याच दिवशी संबंधित तथाकथित सेक्स सीडी उघडकीस आली होती. याच दिवशी आपण आपल्या मुलीशी शेवटचं बोललो असा दावाही पीडितेच्या वडिलांनी केला आहे.
वाचा -सेक्स सीडी प्रकरण: रमेश जारकीहोळी म्हणाले, महानायकानं यात अडकवलं, महिलेला दिले 5 कोटी
याबाबत अधिक माहिती देताना पीडितेचे वडील म्हणाले की, 'संबंधित व्हिडीओमध्ये दिसणारी युवती माझी मुलगी नाही. कोणीतरी आपल्या मुलीसारख्या दिसणाऱ्या युवतीचा वापर केला आहे. याबाबतचा खुलासा स्वतः पीडित मुलीने आपल्या आईकडे केला असल्याचंही वडिलांनी सांगितलं आहे. याबाबत पालकांनी दोन मिनिटांचा व्हिडीओ जारी केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आपला जीव धोक्यात असल्याचं म्हटलं आहे.
तसंच या व्हिडीओमध्ये संबंधित युवतीच्या आईनं सांगितलं की, त्यांनी 2 मार्च रोजी आपल्या मुलीसोबत शेवटचा संवाद साधला होता. यावेळी पीडित युवतीनं सांगितलं होतं की, 'याप्रकरणावर फोनवर बोलण्यापेक्षा घरी येवून समोरासमोर सर्व बाबी समजावून सांगेल.' पण तेव्हापासून ती बेपत्ता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Karnataka, Kidnapping, Ramesh Jarkiholi, Victim