बारमेर (राजस्थान) 13 मार्च : शिक्षकांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांना (school students) कोणत्याही प्रकारची शिक्षा करू नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे नियम आता करण्यात आले आहेत. मात्र चक्क इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना (engineering students) प्राध्यापकांनी बेल्टने मारल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. इतकंच नाही, तर त्यांना मारहाणीनंतर हॉस्टेलमधूनही काढून टाकण्यात आलं आहे.
काय आहे प्रकरण?
राजस्थान (Rajasthan) मधील बारमेर (Barmer) येथील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांबाबत हा प्रकार घडला आहे. योगेंद्र सिंह, सुखदेव पवार, श्यामवीर, ऋषभ सोनी, आणि प्रियांश अशी या पाच विद्यार्थ्यांची नावं आहेत. हे सर्व पेट्रोलियम इंजिनिअरिंग विभागातील तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थी (third year students) आहेत. या विद्यार्थ्यांवर चोरीचा आरोप करत कॉलेजमधील प्राध्यापक देव सिंह, भंवर स्वामी आणि सबरजिस्टार भैरु सिंह चौहान यांनी त्यांना अत्यंत निर्दयपणे मारहाण केली आणि जीव घेण्याची धमकी दिली असा आरोप आहे.
या प्रकरणातील एका पीडित विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, या घटनेला चार दिवस उलटल्यानंतरही याबाबत कोणतीही पोलीस तक्रार करण्यात आलेली नाही. त्यामुळे या घटनाक्रमावर संशय व्यक्त केला जात आहे. अज्ञात व्यक्तीने या मारहाणीची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांना दिली. त्यानंतर या पालकांनी हॉस्टेलमध्ये धाव घेऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. मात्र या कॉलेजपासून थोड्याच अंतरावर असलेल्या ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये याबाबत कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही.
( वाचा : Facebook वरील मैत्री पडली महागात, तरुणीनं घातला दहा लाखाचा गंडा )
विद्यार्थ्यांना हॉस्टेलधून काढलं
कॉलेज प्रशासनाने मारहाण करणाऱ्या प्राध्यपकांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. उलट त्यांनी पीडित विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधून निलंबित केलं. तसंच त्यांची कोणतीही मेडिकल टेस्ट देखील घेण्यात आलेली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आता नाईलाजाने हॉस्टेलच्या बाहेर राहवं लागत आहे.
'आपण कोणताही नियमभंग केला नाही तरीही बेल्ट आणि दंडुक्याने आपल्याला मारहाण करण्यात आली' असा आरोप पीडित विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकरणात न्यायालयात धाव घेण्याचा विद्यार्थी विचार करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Rajasthan, Violence