रायगड, 21 ऑक्टोबर : इंडोनेशियावरून आलेली क्रिस्ती नावाची तरुणी चक्क रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली तालुक्यातील पडघवली येथून रविवारी (दि.18) रात्री आठच्या सुमारास बेपत्ता झाल्याची तक्रार पाली पोलीस स्थानकात आली. ही तरुणी पुण्याला आपल्या मित्राला भेटायला निघाली होती. सुधागड तालुक्यातील व जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी तरुणीचा कसून शोध घेतला. मात्र या तरुणीने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोलीस व तिच्या मित्राला चांगला गुंगारा दिला आणि अखेरीस ती इंडोनेशियातच असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
या बाबत तरुणीचा मित्र सुरजप्रकाश विनोदकुमार दिवेली (वय. 28) राहणार मगरपट्टा सिटी हडपसर, पुणे याने क्रिस्ती हरवली असल्याची खबर मंगळवारी (ता.20) दुपारी पाली पोलीस स्थानकात दिली. 'क्रिस्ती अजलेना दशेरा (वय 27) राहणार इंडोनेशिया ही उबेर टॅक्सीने पुण्याकडे निघाली होती. उबेर टॅक्सीवाल्याने आपण मगरपट्टा पुणे येथे पोहचलो आहोत असे सांगून क्रिस्ती हिला सुधागड तालुक्यातील पडघवली येथे सोडून तो निघून गेला. मात्र त्यानंतर क्रिस्ती कोणालाही दिसली नाही,' असं आपल्या फिर्यादीत सूरजप्रकाश याने सांगितलं. पोलिसांनी क्रिस्तीचा संपूर्ण परिसरात शोध घेतला मात्र ती सापडली नाही.
तरुणाला गंडवलं, ती इंडोनेशियातून भारतात आलीच नव्हती!
सदर व्यक्तीने रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता ती बेपत्ता तरुणी मिळाली असल्याचे सांगितले. त्यानंतर पाली पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी सांगितले की तक्रारीत नमूद इंडोनेशियातील कथित बेपत्ता तरुणीच्या मोबाईल लोकेशनच्या सहाय्याने आम्ही कसून शोध घेतला. त्यानंतर आम्ही मोबाईल संदेशाद्वारे तिच्याशी संपर्क साधला असता प्रारंभी सदर तरुणीने मी क्लिनिकमध्ये उपचार घेत असल्याचे सांगितले.
त्यादृष्टीने पोलिसांनी शोध घेतला, मात्र नंतर तिच्या ऑफिसमध्ये संपर्क साधला असता ती तरुणी इंडोनेशियामध्ये असल्याचे निष्पन्न झाले. तसेच मुंबई एअरपोर्टला चौकशी केल्यावर अशा नावाची कोणी व्यक्ती इंडोनेशियावरून भारतात आलीच नाही, असं सांगण्यात आल्याची माहिती बाळा कुंभार यांनी दिली. तिचा पुण्यातील मित्र असलेल्या व तक्रारदार तरुणाला क्रिस्ती खूप दिवसांपासून चकवा देत होती असे पोलिसांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणाने जिल्ह्यासह तालुक्यातील पोलिसांची पुरती दमछाक झाली. एवढेच काय तर या प्रकरणामुळे विविध तर्कवितर्क देखील काढले जात होते.