पुणे, 4 सप्टेंबर : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्पाच्या नावाखाली अवैध धंदे सुरू होते. या अवैध धद्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सिंहगड रस्त्यावरील टोनी सोसायटीच्या व्यापारी संकुलात हा प्रकार सुरू होता. यावेळी थायलंडमधील एका महिलेसह तीन महिलांची सुटका या कारवाईदरम्यान करण्यात आली. पुणे ग्रामीण पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - या स्पा तसेच मसाज सेंटरमध्ये अवैध धंदे सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर त्यांनी याबाबत खात्री करण्याचे ठरवले. तसेच यासाठी त्यांनी याठिकाणी डिकॉय ग्राहक पाठवले आणि यानंतर येथे छापा टाकला. छापा टाकल्यानंतर स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे लक्षात आले, अशी माहिती पोलीस अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली. याप्रकरणी या स्पाच्या व्यवस्थापकासह अन्य तिघांविरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन महिलांना जबरदस्तीने आणले - याठिकाणी स्पा मॅनेजर आणि इतर तिघांनी तीन महिलांना जबरदस्तीने आणले होते. तसेच त्यांना पैसे देण्याचे आमिष दाखवले आणि त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. आता या महिलांची सुटका करण्यात आली आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली. याठिकाणी थायलंडमधील महिला कशी काय आली, याचा तपासही पोलीस करत आहेत. तिची सर्व कागदपत्रे, प्रवासाबाबतची माहितीही पोलीस शोधत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हेही वाचा - पुणे : घर भाड्याने देण्याची ऑनलाईन जाहिरात पडली महागात, गुगल पे ची लिंक केली क्लिक अन् दरम्यान, पुण्यात अनेक ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली सर्रास अशाप्रकारे अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे अशा प्रकारे सुरू असणाऱ्या अवैध धद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.