जळगाव, 16 नोव्हेंबर: जळगाव (Jalgaon) तालुक्यातील वावडदा (Wavdada) येथे एका संतापजनक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका मद्यधुंद तरुणानं गर्भवती महिलेला तब्बल 20 ते 30 फुटांपर्यंत फरफटत नेल्याची (Bike hit pregnant woman) घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत भरधाव दुचाकी गर्भवती महिलेच्या पोटावरून गेल्यानं महिलेसह पोटातील अर्भकाचा देखील मृत्यू (pregnant woman and Infant death) झाला आहे. ही संतापजनक घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित दुचाकीस्वारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तेव्हाच मृतदेह ताब्यात घेऊ, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यानं परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
ज्योती दीपक गोपाळ असं संबंधित मृत पावलेल्या 21 वर्षीय विवाहितेचं नाव असून त्या वावडदा येथील गोपाळवाडा परिसरात वास्तव्याला होत्या. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ज्योती या आपल्या दोन नणंदासोबत गावाबाहेर शौचास जात होत्या. दोन्ही नणंदा पुढे तर दोन जीवांच्या ज्योती त्यांच्या पाठीमागे चालत होत्या. दरम्यान वावडदा येथील रहिवासी असणारा 25 वर्षीय युवक सुपडू ऊर्फ नाना विक्रम गोपाळ हा मद्यधुंद अवस्थेत भरधाव दुचाकीवर समोरून आला.
हेही वाचा-लग्नासाठी कपलनं कुटुंबासह पोलिसांना आणलं नाकीनऊ; 10 तास पाण्याच्या टाकीवर ठिय्या
मद्यधुंद असल्यानं त्याचं दुचाकीवर नियंत्रण नव्हतं. तो समोरून तिघींच्या दिशेनं येत असल्याचं पाहून दोन्ही नणंदा आपला जीव वाचवण्यासाठी रस्त्याच्या बाजूला झाल्या. पण भरधाव दुचाकीस्वारानं ज्योती यांना जोरदार धडक मारली. हा अपघात इतका भीषण होता. गर्भवती असणाऱ्या ज्योती दुचाकीसोबत 20 ते 30 फूट फरफटत गेल्या. ही भरधाव दुचाकी आठ महिन्यांच्या गरोदर असणाऱ्या ज्योती यांच्या पोटावरून गेली.
हेही वाचा-VIDEO: एका क्षणात होत्याचं झालं नव्हतं; बिबट्यानं चिमुकल्याची केली भयावह अवस्था
त्यामुळे अपघातात ज्योती यांचा आणि त्यांच्या पोटातील अर्भकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही संतापजनक घटना समोर येताच गावात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अपघाती मृत्यूची नोंद केली. पण आरोपीविरोधात जोपर्यंत सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. त्यामुळे गावात बराच वेळ तणावाचं वातावरण होतं. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर उशिरा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jalgaon, Road accident