बीड, 23 जुलै : गुटख्याच्या कारवाईतील गुटखा, चक्क पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी पळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर हा गुटखा पळवणाऱ्या अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षकांनी चांगलाच दणका दिला आहे. बीडच्या पाटोदा पोलीस ठाण्यातील पोलिसांना गुटख्याचा कंटेनर अडवायला पाठविले होते. मात्र पोलिसांनी तो अडवल्यानंतर त्यातील 50 पोते गुटख्याऐवजी, कारवाईत केवळ 27 पोते दाखविला आणि 23 पोते गुटखा पाटोदा शहरातील हुले कन्स्ट्रक्शन कार्यालयात पसार केला. ही बाब समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सहायक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर, पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर आणि कृष्णा डोके यांना निलंबित केले आहे. त्यांच्या निलंबन आदेशातचं हे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे . दरम्यान बीड जिल्ह्यात मागच्या काही दिवसात आयपीएस पंकज कुमावत यांच्या पथकाने गुटख्याच्या अवैध धंद्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र अनेक ठिकाणी गुटखा व्यापाऱ्यांना पोलिसांचेच अभय असल्याची चर्चा सातत्याने होत असते. त्याचा प्रत्यय आता बीडच्या पाटोदा येथील कारवाई समोर आला आहे. तर वाळूनंतर आता गुटख्याच्या अवैध धंद्यात काही पोलीस देखील आपले हात ओले करत असल्याचचं भेसूर वास्तव समोर आलं आहे. त्यामुळं अशा पोलिसांवर देखील कडक कारवाई करावी, अशीच मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.