मेरठ, 28 नोव्हेंबर: स्त्रियांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे करण्यात आलेत. पोलीसही वेळोवेळी तसे प्रयत्न करतात, मात्र अजूनही स्त्रियांबाबतच्या गैरवर्तनाच्या घटना समाजात घडत आहेत. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका शिक्षेकेशी गैरवर्तन केल्याबद्दल चार विद्यार्थ्यांना पोलिसांनी सोमवारी (27 नोव्हेंबर) ताब्यात घेतलं आहे. उत्तर प्रदेशातील राधना इनायतपूर गावातल्या एका महाविद्यालयात ही घटना घडली आहे. त्या संदर्भात एका विद्यार्थिनीसह चार विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही मुलं बारावीत शिकतात. त्यांच्यावर शिक्षिकेशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. शिक्षिकेनं पोलिसांकडे तशी लेखी तक्रार नोंदवली होती. त्याबाबत किथौर पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी अरविंद मोहन शर्मा यांनी सांगितलं, की “शिक्षिकेबाबत ते विद्यार्थी घाणेरडी शेरेबाजी करत होते. त्याबाबत शिक्षिकेनं त्यांना वेळोवेळी त्यांना दरडावलं होतं, मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.” विद्यार्थ्यांच्या गैरवर्तनाबाबत 27 वर्षांच्या शिक्षिकेनं आरोप केले आहेत. “अनेक दिवसांपासून हे सुरू होतं. मात्र 24 जूनला त्यांनी मर्यादा ओलांडली. त्यांच्यातील काही विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात मला ‘आय लव्ह यू’ असं म्हटलं. त्याचा व्हिडिओ काढला व सोशल मीडियावर व्हायरल केला,” असं त्या शिक्षिकेनं आरोपात म्हटलं आहे. त्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी वर्गात शिक्षिकेला उद्देशून अश्लील शेरेबाजी केल्याचाही एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. हेही वाचा: बापाच्या हत्येचा सावत्र मुलाने आईसोबत रचला कट; कारणही तितकेच धक्कादायक शिक्षिकेशी गैरवर्तन व अश्लील शेरेबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, त्यांना ताब्यात घेतल्याबद्दल रविवारी (27 नोव्हेंबर) पोलिसांनी ट्विट केलं. त्या विद्यार्थ्यांना बाल न्याय आयोगासमोर हजर करण्यात आलं. ताब्यात घेण्यात आलेले सर्व विद्यार्थी 16 वर्षांचे आहेत. त्यांच्यावर शिक्षिकेला त्रास देणं, असभ्य बोलणं व गैरवर्तन केल्याचे आरोप आहेत. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. मात्र शिक्षिकेनं तिच्या परीनं त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. अखेरीस सहन न झाल्यानं तिनं विद्यार्थ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यावर आता पोलिसांनी कारवाई केली आहे, मात्र याबाबत आणखी माहिती मिळालेली नाही. समाजात स्त्रियांशी होणाऱ्या गैरवर्तनामुळे वातावरण असुरक्षित झालं आहे. स्त्री संरक्षणासाठी अनेक कायदे झाले आहेत. काही संस्थाही स्त्रियांच्या बाजूने उभं राहून लढतात. स्त्रियांना त्यांचे हक्क व न्याय मिळवून देतात. मात्र अजूनही समाजातल्या सर्व घटकांकडून स्त्रियांचा सन्मान राखला जात नाही, ही वस्तुस्थिती आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.