नागपूर 1 मार्च : देश डिजीटल युगाकडे वाटचाल करत असला तरी देशाच्या काही भागात अजूनही अंधश्रद्धा आणि काही परंपरा अगदीच जाचक आहेत. आजही अनेक लोक जादू टोना आणि भोंदू बाबांनी दाखवलेल्या आमिषांवर विश्वास ठेवून काहीही करण्यास तयार होतात. अशीच एक घटना आता नागपुरमधून समोर आली आहे. नागपुरात 50 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून मुलीवर जादू टोना (Black Magic) केल्याप्रकरणी आणि यासाठी तिच्यावर दबाव टाकल्याप्रकरणी 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 26 फेब्रुवारीला पीडित मुलीकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत मुलीनं म्हटलं आहे, की काही दिवसांपूर्वी तिला एक व्यक्ती भेटला होता. त्यानं तिला श्रीमंत बनवण्याचं स्वप्न दाखवलं
पुढे मुलीनं सांगितलं, की तो म्हणाला जरं तू काही गोष्ट केल्या तर तू श्रीमंत होशील आणि आभाळातून 50 कोटी रुपयांचा पाऊस पडेल. मुलगी या जाळ्यात पूर्णपणे अडकली होती. मात्र, जेव्हा आरोपीनं मुलीला कपडे काढण्यास सांगितलं तेव्हा तिला शंका आली आणि तिनं या लोकांकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. मात्र, यानंतरही आरोपी पीडितेवर दबाव टाकू लागले. यानंतर पीडितेनं पोलिसात याबाबतची तक्रार दिली.
पोलिसांनी या तक्रारीनंतर आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपींची नावं विकी गणेश खपरे (वय 20), दिनेश महादेव निखरे ( वय 25), रामकृष्ण दादाजी म्हास्कर ( वय 41), विनोद जयराम मसराम (वय 42) आणि डीआर उर्फ सोपान हरिभाऊ कुमरे (वय 35) अशी आहेत. लकडगंज पोलिसांनी काळी जादू कायदा, पोक्सो आणि अन्य कायद्यांतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Nagpur