इराण, 17 सप्टेंबर : कर्नाटकसह देशभरात हिजाब प्रकरण चर्चेचा विषय ठरला होता. स्लिम विद्यार्थिनींनी हिजाबशिवाय क्लासेसमध्ये जाण्यास नकार दिल्यानंतर मोठा वाद सुरू झाला होता. हिजाबसंबंधितच आता इराण देशातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. इराणमध्ये एका तरुणीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. हिजाब न घातल्याने पोलिसांनी तिला अटक केली होती.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
इराणमधील माध्यमे आणि मृताच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर आरोप करत न्यायाची मागणी केली आहे. महसा अमिनी, असे या 22 वर्षीय तरुणीचे नाव आहे. ही तरुणी काही दिवसांपूर्वी तिच्या कुटुंबासह इराणच्या राजधानी तेहरान येथे जात होती. तेव्हा पोलिसांनी तिला हिजाब घातला नसल्यामुळे अटक केली. इराणमध्ये कठोर इस्लामिक ड्रेस कोड आहे ज्यामुळे महिलांना सार्वजनिक ठिकाणी हेडस्कार्फ घालणे बंधनकारक आहे.
अटक होण्याआधी ती स्वस्थ होती. मात्र, अमिनीला अटक झाल्यानंतर काही तासांनी कोमामध्ये रुग्णालयात नेण्यात आले होते आणि आता तिथे तिचा मृत्यू झाला आहे. पोलीस ठाण्यात येण्यापासून ते रुग्णालयात जाण्यामध्ये काय झाले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे पर्शियन-भाषेच्या माध्यमांनी पीडितेच्या कुटुंबाचा हवाला देत म्हटले आहे. या तरुणीला पोलिसांकडून भयंकर मारहाण करण्यात आली, त्यात तिचा मृत्यू झाला, असे काही माध्यमांनी म्हटले आहे.
अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने म्हटले आहे की, "कोठडीत 22 वर्षीय महिला महसा अमिनीचा संशयास्पद मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला, यात छळ आणि इतर कोठडीतील गैरवर्तनाच्या आरोपांची फौजदारी चौकशी झाली पाहिजे." इराणमधील अमेरिकेचे राजदूत रॉबर्ट माले यांनी महसाच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. असे अत्याचार थांबले पाहिजेत आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असे म्हटले आहे. तर पोलिसांनी मारहाणीचे आरोप फेटाळून लावले आहेत.
हेही वाचा - बापरे! 43 वर्षात पठ्ठ्याने केली 53 लग्नं; अतिशय विचित्र आहे कारण
इराणमधील उल्लंघनांवर नजर ठेवणाऱ्या 1500 तवसीर वाहिनीने सांगितले की, पीडितेच्या डोक्याला दुखापत झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या प्रतिमांमध्ये महसावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयाबाहेर जमाव जमला होता आणि पोलीस तेथे जमलेल्या डझनभर लोकांना पांगवण्याचा प्रयत्न करत होते. तेहरानमध्ये संध्याकाळी लोक रागाच्या भरात सरकारविरोधी घोषणाबाजी करताना दिसले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.