जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / चार दिवसांत रोखले तब्बल 5 बालविवाह, नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई

चार दिवसांत रोखले तब्बल 5 बालविवाह, नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई

सांकेतिक छायाचित्र

सांकेतिक छायाचित्र

नंदूरबार पोलिसांनी मागील 4 ते 5 दिवसांत मोठी कामगिरी केली आहे.

  • -MIN READ Nandurbar,Maharashtra
  • Last Updated :

नंदुरबार, 15 मे : गेल्या काही दिवसांत नंदुरबार जिल्ह्यात बालविवाहाच्या घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे याविरोधात जिल्हा पोलिस दलाने बालविवाह रोखण्याचा धडाका सुरुच ठेवला आहे. यातच आता नंदुरबार जिल्ह्यात मागच्या चार दिवसांत पोलिसांनी तब्बल 5 बालविवाह रोखले आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील सरी केलीपाडा आणि निंबापाटी राऊतपाडा येथे होत असलेला बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. दोन्ही बालविवाह रोखल्याने गेल्या चार दिवसात पोलिसांनी तब्बल पाच बालविवाह रोखले आहेत. मोलगी पोलीस ठाणे हद्दीतील सरी केलीपाडा आणि अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीत निंबापाटी राऊतपाडा येथील अल्पवयीन मुलींचा विवाह 13 मेला होणार आहे, अशी माहिती मोलगी आणि अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे माहिती मिळताच पोलिसांनी याबाबत तत्काळ दखल घेतली आणि याप्रकाराबाबत पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना कळविले. हेही वाचा -  बालविवाह होऊनही तक्रार देण्यास ग्रामसेवकाची टाळाटाळ; घटनेला तालुका प्रशासनाचं पाठबळ? पोलीस अधीक्षकांना याबाबतची माहिती देण्यात आल्यावर त्यांनी हे बालविवाह थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकांनी दोन्ही ठिकाणी धाव घेतली. यात सरी केलीपाडा येथील मुलीचा विवाह हा अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी येथील तरुणासोबत निश्चित करण्यात आला होता. यावेळी मोलगी पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे समुदेशन करत त्यांचे मनपरिवर्तन केले. त्यामुळे पोलिसांनाच्या या समुपदेशनानंतर पालकांनी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर लग्न करण्याची हमी दिली. दरम्यान, मुलीच्या पालकांना मोलगी पोलिसांकडून कायदेशीर नोटीसही देण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीतील निंबापाटी राऊतपाडा येथे अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेश गावित यांनी भेट दिली. याठिकाणी असलेल्या मुलीचा विवाह हा वालंबा गावातील तरुणासोबत निश्चित करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी संबंधितांचे समुपदेशन केल्यानंतर त्यांनीही मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर लग्नाची हमी दिली. दरम्यान, नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून ऑपरेशन अक्षता हे राबवण्यात आले. याअंतर्गत पोलिसांनी चार दिवसात पाच बालविवाह रोखले आहेत. पोलिसांनी यशस्वीपणे राबविलेल्या या अभियानामुळे पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात