नवी दिल्ली, 28 डिसेंबर : वेगवेगळ्या पद्धतीनं ऑनलाइन फसवणुकीचं प्रमाण वाढलं आहे. यामध्ये सोशल मीडिया किंवा एखाद्या वेबसाइटवरून मैत्री करून फसवणूक करण्याचं प्रमाण जास्तच आहे. आजकाल तर ओळख ना पाळख अशा कोणालाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मित्र म्हणून स्वीकारलं जातं. त्याच्याशी गप्पा मारल्या जातात, पण तो विश्वास ठेवण्यालायक आहे की नाही, हे कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
पंजाब राज्यातील लुधियानामध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका व्यक्तीनं एका तरुणीशी वधू-वर सूचकाच्या वेबसाइटवरून ओळख झाल्यानंतर तिला तब्बल 25 लाख 93 हजार रुपयांना गंडा घातलाय. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. ‘अमर उजाला’ने याबाबत वृत्त दिलंय.
हे ही वाचा : Crop Insurance : पिकांचं नुकसान झाल्यास सरकार करणार भरपाई, फक्त करा हे एक काम
सराभानगर पोलीस स्टेशमध्ये पीडित तरुणीच्या तक्रारीवरून ऑनलाइन फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विपिन कुमार (रा. बारपूर गुरुकुल, हरिद्वार), कांती स्टोर ( रा. मानकपूर, गाझियाबाद), सुनील कुमार ( रा. मोहल्ला राजपूत, गावगोंडा, नवी दिल्ली), रिता राणी (रा. पूर्व दिल्ली) अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींच्या विरोधात ऑनलाइन फसवणुकीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अशी झाली फसवणूक
पीडित तरुणीनं संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला आहे. त्यानुसार, वधू-वर सूचकाच्या वेबसाईटच्या माध्यमातून पीडितेची आरोपी विपिन कुमारशी ओळख झाली होती. त्याने तिला लग्न करण्याचं वचनही दिलं होतं. विपिन कुमार याने सीबीआय इन्स्पेक्टर असल्याचं पीडितेला सांगितलं होतं. सहा महिन्यांनंतर, त्यानं तिला सांगितलं की, तो एका प्रकरणाच्या तपासा संदर्भात पश्चिम बंगालमध्ये आलाय. पण येथे त्याची आरोपीशी झटापट झाली व त्याला गोळी लागली.
आता त्याला उपचारासाठी पैशांची आवश्यकता आहे. त्यानंतर उपचाराच्या नावाखाली आरोपीनं पीडितेकडून 25 लाख 93 हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर त्यानं मात्र तिच्याशी बोलणं बंद केलं. अखेर फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडितेनं पोलीस ठाणं गाठलं, व आरोपी विपिन कुमार याच्यासह त्याच्या साथीदारांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा : खळबळजनक! मुलीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला जाब विचारायला गेलेला जवान, मृतदेहच घरी पोहोचला
दरम्यान, सोशल मीडिया किंवा इतर वेबसाइटच्या माध्यमातून ओळख वाढवून फसवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनोळखी व्यक्तीसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवताना सावध राहण्याची गरज आहे. तसेच कोणालाही पैशांची मदत करताना काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा तुमचीही ऑनलाइन फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Punjab, West bangal