चंदीगड 04 जून : सोशल मीडियाचा (Social Media) वापर आता प्रचंड प्रमाणात वाढला आहे. याचे फायदे जसे आहेत तसे तोटेही आहेत. सोशल मीडियच्या माध्यमातून लोकांच्या फसवणूकीचे प्रकारही वाढले आहेत. अलीकडेच करनालमधील (Karnal) इंद्री इथं राहणाऱ्या एका व्यक्तीनं पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल केली आहे. त्यात त्याला पैसे न दिल्यास न्यूड मुलीशी (Nude Girl) चॅट करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याचं त्यानं म्हटलं आहे. तब्बल एक कोटी रुपयांची मागणी या व्यक्तीकडे करण्यात आली होती.
एकदा या व्यक्तीच्या फेसबुक मेसेंजरवर (Facebook Messenger) एक व्हिडिओ कॉल आला. त्यानं तो उचलताच समोर एक न्यूड मुलगी व्हिडीओ कॉलवर होती. त्यानं फोन डिस्कनेक्ट केला; पण त्यानंतर अनेकदा त्याला कॉल आले. ते उचलले नाहीत तर त्याच्या फोनवर फोन आले आणि तो न्यूड मुलीशी चॅट करत असल्याचा व्हिडिओ असून पैसे न दिल्यास तो व्हिडिओ व्हायरल करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. अशाप्रकारे धमकावून पैसे उकळल्याची प्रकरणे देशभरातून पुढे येत असून, विवाहित पुरुषांपासून ते तरुणांपर्यंत सर्वजण या जाळ्यात अडकत आहेत.
असा सुरू होतो खेळ :
अशाप्रकारे लोकांना जाळ्यात ओढणाऱ्यांचे एक मोठे रॅकेटच देशात कार्यरत आहे. या रॅकेटमधील लोक प्रथम फेसबुकवर एका सुंदर मुलीच्या फोटोसह एक आयडी तयार करतात. त्याची फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर खरा खेळ सुरू होतो. सुंदर मुलीचा फोटो पाहिल्यानंतर बहुतेक पुरूष फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारतात. त्यानंतर हाय-हॅलो सुरू होते. काही वेळातच तुम्हाला व्हॉट्सअॅप (Whatsapp) नंबर विचारला जातो. तुम्ही नंबर दिलात की, व्हॉट्सअॅपवर गप्पा सुरू होतात. तुम्हाला सेक्समध्ये रस आहे का? असे प्रश्न विचारले जातात. अनेकजण या जाळ्यात अडकतात. त्यानंतर व्हिडिओ कॉलची (Video Call) कहाणी सुरू होते. ही टोळी संगणकाद्वारे एक अश्लील व्हिडिओ प्ले करते. यात एक न्यूड मुलगी अश्लील हालचाली करत चॅट सुरू करते. काही मिनिटांनंतर फोन कॉल बंद केला जातो आणि त्यानंतर एक फोन येतो ज्यावर तुम्ही आता एका मुलीबरोबर करत असलेल्या चॅटचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. आम्हाला पैसे द्या अन्यथा हा व्हिडिओ व्हायरल केला जाईल, अशी धमकी देण्यात येते. बरेच लोक पैसे देतात आणि सुटका करून घेतात. अनेकजण या रॅकेटला बळी पडले आहेत.
अशा ब्लॅकमेलिंगपासून कसं वाचाल :
अशा ब्लॅकमेलिंगपासून (Blackmailing) वाचण्यासाठी करनालचे पोलीस अधीक्षक (SP) गंगा राम पूनिया यांनी काही सूचना केल्या आहेत. सर्वप्रथम, आपण ज्याला ओळखत नाही अशा कोणत्याही व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट (Friend Request) स्वीकारू नये. स्वीकारलीच तर त्या व्यक्तीशी बोलू नये, ओळख वाढवू नये. त्या व्यक्तीच्या फ्रेंड लिस्टमध्ये जाऊन आपण त्या व्यक्तीचे फ्रेंडस कोण आहेत हे तपासू शकता. कोणत्याही परिस्थितीत आपला मोबाइल नंबर देऊ नका. काहीही अश्लील संभाषण करू नका. अज्ञात व्यक्तीच्या व्हिडिओ कॉलला उत्तर देऊ नका. कारण तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. तुम्ही फोन उचललात तर नंतर तुमच्याकडून पैशाची मागणी केली जाईल. तुम्ही पैसे दिले नाहीत तर तुमचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जाईल. त्यामुळं सावधगिरी बाळगा. अशी काही घटना तुमच्यासोबत घडली तर तत्काळ सायबर क्राइम पोलिसांना कळवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Online crime