मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /एक मिनिटाचा कॉल आणि 2.8 कोटींचा भुर्दंड; असा अडकला सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात

एक मिनिटाचा कॉल आणि 2.8 कोटींचा भुर्दंड; असा अडकला सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात

file photo

file photo

गेल्या काही दिवसांपासून सेक्स्टॉर्शनची प्रकरणं वाढताना दिसत आहेत.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Gujarat, India

  अहमदाबाद, 13 जानेवारी : गेल्या काही वर्षांत सायबर गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. फसवणूक करण्यासाठी स्कॅमर्स वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करताना दिसतात. ओटीपी, लिंक, फेक कॉलिंगच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकार आपण सर्रास ऐकतो, वाचतो. यात आता आणखी एका नवीन पद्धतीचा समावेश झाला आहे. ही नवीन पद्धत म्हणजे सेक्स्टॉर्शन होय. गेल्या काही दिवसांत सेक्स्टॉर्शनच्या माध्यमातून फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढले आहेत. सेक्स्टॉर्शन म्हणजे काय, या पद्धतीचा वापर करून ब्लॅकमेल कसं करतात आणि पैसे कसे उकळले जातात ते सविस्तर जाणून घेऊ या. `आज तक`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.

  गेल्या काही दिवसांपासून सेक्स्टॉर्शनची प्रकरणं वाढताना दिसत आहेत. अशाच एका प्रकरणात एका व्यक्तीकडून 2.8 कोटी रुपये उकळण्यात आल्याचं उघड झालं आहे. गुजरातमधल्या अहमदाबादमधला 68 वर्षांचा एक व्यावसायिक सेक्स्टॉर्शनला बळी पडला आहे. ऑगस्ट 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत या व्यक्तीकडून 11 वेगवेगळ्या लोकांनी 2.8 कोटी रुपये वसूल केले आहेत. अनेकदा व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या काही सेकंदाच्या अनोळखी कॉलच्या माध्यमातून स्कॅमर्स संबंधितांची अश्लील क्लिप तयार करतात. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात होते. या प्रकाराला सेक्स्टॉर्शन म्हणतात.

  सेक्स्टॉर्शनमध्ये सर्वप्रथम फसवणूक करणारे एखाद्या व्यक्तीला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करतात. व्हॉट्सअ‍ॅपवर रिप्लाय मिळाला तर थोडावेळ संवाद साधला जातो. त्यानंतर स्कॅमर्स व्हिडिओ कॉल करतात. एखाद्या युझरने व्हिडिओ कॉल रिसीव्ह केला तर काही सेकंदात स्कॅमर्स त्याचा एक मॉर्फ्ड व्हिडिओ तयार करतात. त्यानंतर युझरला कधी पोलिसांच्या नावाने तर कधी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या नावाखाली धमकी दिली जाते.

  खरं तर, सेक्स्टॉर्शनसारखे प्रकार टाळण्यासाठी युझर्सनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. व्हॉट्सअ‍ॅप किंवा दुसऱ्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर आलेल्या अनोळखी कॉल्सपासून सावध राहणं आवश्यक आहे. काही वेळा स्कॅमर्स थेट व्हिडिओ कॉल करतात. त्यामुळे अशा अनोळखी व्हिडिओ कॉलला उत्तर देणं टाळलं पाहिजे. तुम्ही चुकून कॉल रिसीव्ह केला तर स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकणार नाही, याची काळजी घ्या. तुम्हाला एखाद्या गोष्टीची खूप काळजी वाटत असेल तर न घाबरता पोलिसांकडे जा. कोणत्याही परिस्थितीत स्कॅमर्सना पैसे देऊ नका.

  हेही वाचा - 65 वर्षाच्या वृद्धाचा मेहुण्याच्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; एक फोन कॉल अन्..

  अहमदाबादमध्ये नुकतंच सेक्स्टॉर्शनचं प्रकरण उघडकीस आलं आहे. या व्यक्तीकडून स्कॅमर्सनी 2.8 कोटी रुपये उकळल्याचं स्पष्ट झालं आहे. पीडित व्यक्तीने दिलेल्या तक्रारीत असं म्हटलं आहे, `या सर्व फसवणुकीला 8 ऑगस्टपासून सुरुवात झाली. 8 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मला एका मुलीचा मेसेज आला. तिनं मोरबी इथली असल्याचं सांगितलं. काही सेकंद बोलणं झाल्यानंतर तिनं व्हिडिओ कॉल केला आणि व्हर्च्युअल सेक्सची मागणी करू लागली.`

  `सुरुवातीला मी यास विरोध केला; मात्र यात कोणतीही अडचण नसल्याचं मुलीने सांगितलं. त्यानंतर या व्यक्तीने कॉल सुरू ठेवला. हा कॉल एक मिनिटापर्यंत सुरू होता आणि त्यानंतर मुलीने तो डिस्कनेक्ट केला. त्यानंतर मुलीने कॉल करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 50 हजार रुपयांची मागणी केली,` असं तक्रारदारानं सांगितलं.

  यानंतर पीडित व्यक्तीने लगेच पैसे दिले आणि तिथून ब्लॅकमेलिंगला सुरूवात झाली. कुणी पोलीस तर कुणी सायबर क्राइम सेलचे अधिकारी बनून या व्यावसायिकाकडून पैसे उकळले. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. सेक्स्टॉर्शनच्या जवळपास सर्वच प्रकरणांमध्ये असा प्रकार केला जातो. त्यामुळे अशा अनोळखी कॉल्सपासून सावध राहणं गरजेचं आहे.

  First published:

  Tags: Crime news, Gujrat, Sexual harassment