Home /News /crime /

खेड हादरलं! घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आठवड्यातील दुसरी घटना

खेड हादरलं! घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आठवड्यातील दुसरी घटना

गेल्याच आठवड्यात खेड मधील खोपी गावात अशाच प्रकारे एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती.

    चंद्रकांत बनकर,प्रतिनिधी खेड, 16 सप्टेंबर : रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील सोनगाव गावात घरात एकटी असणाऱ्या एक अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या  प्रकरणी त्याच गावातील रोशन खेराडे या तरुणावर  खेड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास  खेड तालुक्यातील सोनगाव गावात ही घटना घडली.  आरोपी रोशन खेराडे हा पीडित अल्पवयीन मुलीच्या वाडीत राहतो. तो विवाहित असून त्याची पत्नी गर्भवती आहे. मंगळवारी पीडित मुलगी ही घरात एकटी होती घरातील लोकं कामावर गेल्यानंतर व तिची आई दवाखान्यात बाहेर गेल्यानंतर ती शेजारील काकूंकडे गेली होती.  त्यावेळी रोशन खेराडे हा त्या मुलीच्या घरात शिरून लपून बसला होता. ती अल्पवयीन मुलगी घरात आल्यानंतर घरातील दरवाजा आतमधून बंद करून त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले.  जर कुणाला सांगितलेस तर मारून टाकेन अशी धमकी देखील दिली. संध्याकाळी त्या मुलीचे पालक घरी आल्यानंतर तिने घडलेली सर्व हकीकत आई वडिलांना सांगितली. त्यानंतर पीडित मुलीचे पालक आणि तिच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्या नंतर खेड पोलिसांनी रोशन खेराडे याला ताब्यात घेतले. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार खेराडे याच्यावर भादवी कलम ३७६, तसंच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा ( पोस्को ) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आठवडा भरातील दुसरी घटना गेल्याच आठवड्यात खेड मधील खोपी गावात अशाच प्रकारे एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी देखील खेड पोलीस ठाण्यात अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आठवडाभरातील ही दुसरी घटना असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.  घरात एकटी असणाऱ्या मुलींना आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या देखरेखेखाली ठेवा, मुली आणि महिलांना कोण त्रास देत असेल त्यांचा पाठलाग करत असेल अथवा कोणावर संशय असेल तर पोलिसांना कळवा अथवा पोलीस नियंत्रण कक्षात फोन वरून माहिती द्या, मुलींच्या पालकांनी जागरूक राहण्याचे आवाहन खेडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी केले आहे. गुन्हेगारांना कडक कायदेशीर शासन केले जाईल अस आश्वासनही त्यांनी दिले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Ratanagiri, रत्नागिरी

    पुढील बातम्या