शिवाजी गोरे, प्रतिनिधी रत्नागिरी, 18 जुलै : जिल्ह्यातील दापोली विसापूर येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका वयोवृद्ध महिला दीपावती घाग ह्यांचा चोरीच्या उद्देशाने वाडीतीलच महिला सृष्टी संतोष कदम हिने खून केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. संशयित आरोपी सृष्टी कदम हिला पोलिसांनी अटक केली आहे. दापोली येथील वृध्द महिलेच्या खुन प्रकरणातील अज्ञात आरोपी महिलेला पोलिसांनी 12 तासात जेरबंद केलं आहे. काय आहे प्रकरण? दापोली तालुक्यातील मधलीवाडी विसापूर, विश्रांतीनगर येथे घरात एकटी राहणारी वृध्द महिला दिपावती सिताराम घाग, (वय 87) हिच्या छातीवर कोणीतरी अज्ञात आरोपीने जोरदार प्रहार करुन तिचा खून केला होता. तसेच तिच्या गळ्यातील 78 हजार रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ जबरीने चोरुन नेल्याचे उघड झाले होते. वाचा - मानवी कवटी, पूजेचं साहित्य अन् रात्रीच्या अंधारात अघोरी प्रकार; असं फुटलं बिंग सदर घटनेची माहिती दापोली पोलिसांना प्राप्त होताच पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी जावून घटनास्थळाची पाहणी करुन आजुबाजुचे लोकांकडे चौकशी केली. त्यातून मयत हिस चोरीच्या उद्देशाने स्थानिक आरोपीनेच ठार मारले असल्याचा संशय आल्याने आजुबाजुला राहणारे तसेच तिचे नातेवाईक व स्थानिक गावकरी यांचेकडे सातत्याने कसून चौकशी केल्यानंतर आरोपी महिला सृष्टी संतोष कदम, (वय 37 रा. विसापुर मधीलवाडी ता. दापोली) हिचेवर दाट संशय आला. तिला ताब्यात घेऊन तपास केला असता प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर तिला आणखी विश्वासात घेवून चौकशी केली असता तिनेच गुन्हा केल्याची खातरजमा झाली. अशा प्रकारे अवघ्या 12 तासात मयत हिस आरोपी हिने जीवे ठार मारून गळ्यातील सोन्याची बोरमाळ चोरुन नेल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने आरोपी महिलेला अटक करण्यात आलेली आहे. गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, दापोली पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक अहिरे, पोलीस निरीक्षक, दापोली पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव, महेश पाटील, सहा. पोलीस उपनिरीक्षक मिलिंद चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक गायकवाड, स्वप्नील शिवलकर, रुपाली ढोले, पोलीस नाईक निधी जाधव, पोलीस कॉन्स्टेबल विकास पवार, विजेंद्र सातार्डेकर, सुरज मोरे, पंकज पवार, सुहास पाटील, चालक निलेश जाधव, शुभम रजपूत यांनी केली.