नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव, 16 जुलै : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना जळगाव जिल्ह्यात समोर आली आहे. आषाढी अमावस्या असल्याने शेत शिवारात जादूटोणा करत गुप्तधन शोधणाऱ्या टोळीचा चाळीसगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. नागद रोडवरील एका शेतात पडीत घरात हा अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान जादूटोणा करणाऱ्या 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळावरून मानवी कवटी व इतर अघोरी पूजेसाठी लागणारे साहित्य देखील पोलिसांनी जप्त केले आहे. काय आहे प्रकरण? चाळीसगाव पोलीस स्टेशन हद्दीत रात्रगस्त घालत असताना पोलिसांना गोपनीय माहीती मिळाली की, आषाढ आमावस्या असल्याने सकाळी प्रहरीचे सुमारास चाळीसगाव शहरातील नागद रोड लगत नायरा पेट्रोलपंप समोरील शेतातील पडीत घरात काही इसम गोलाकार स्थितीत खाली बसुन त्यामधे मानवी खोपडी व इतर पुजेच्या साहीत्यासह आघोरी पुजा करणेकरीता एकत्रित जमणार आहेत. माहिती मिळाल्याने एक पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. या ठिकाणी पोलिसांनी मारलेल्या छाप्यात अघोरी प्रकार उघडकीस आला. यावेळी लक्ष्मण शामराव जाधव (वय- 45 वर्ष रा. खडकी बायपास ता. चाळीसगांव जि.जळगाव), शेख सलीम कुतुबुददीन शेख (वय- 56 वर्ष रा. हजरत अली चौक नागद रोड चाळीसगांव), अरूण कृष्णा जाधव (वय 42 वर्ष रा.आसरबारी ता.पेठ जि.नाशिक), विजय चिंतामन बागुल (वय 32 वर्ष रा. जेल रोड नाशिक), राहुल गोपाल याज्ञीक (वय 26 वर्ष रा. ननाशी ता.दिंडोरी जि.नाशिक), अंकुश तुळशीदास गवळी (वय 21 वर्ष रा. जोरपाडा ता. दिंडोरी जि.नाशिक), संतोष नामदेव वाघचौरे (वय 42 वर्ष रा.अशोकनगर नाशिक), कमलाकर नामदेव उशीरे (वय 47 वर्ष रा.गणेशपुर पिंप्री ता.चाळीसगाव), संतोष अर्जुन बाविस्कर (वय 38 वर्ष रा.अंतुर्ली (कासोदा) अशा आरोपींना ताब्यात घेतले. वाचा - धक्कादायक! अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करून धर्मांतरणाचा प्रयत्न हे सर्व आरोपी घटनास्थळी गोलाकार स्थितीत खाली बसुन त्यामध्ये मानवी कवटी, लिंबु, नारळ, रुद्राक्ष माळ, देवाची पितळी मुर्ती, पिवळ्या धातुचा नाग, पत्रावरील छापील देव, कंदमुळे, गोलाकार पितळी धातुचे बेरकंगण, केशरी शेदुर, आगरबत्ती पुडा, लोखंडी आडकीत्ता व कापुराची पुजा मांडुन गुप्त धनाकरीता आघेरी कृत्य करुन जादुटोणा करीत होते. यावेळी आरोपींकडे असलेल्या वाहनासह सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सर्व आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व आघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटण करणे बाबत अधिनियम 2013 चे कलम 3(2) व 3(3) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3)चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि सागर ढिकले व पो. कॉ. प्रकाश पाटील हे करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.