नवी दिल्ली, 12 जानेवारी : डिसेंबर (2022) महिन्यामध्ये ओडिशा राज्यामध्ये 12 दिवसांच्या कालावधीत तीन रशियन नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. यापैकी पहिले दोन मृतदेह हॉटेलमध्ये सापडले तर तिसरा मृतदेह एका जहाजात सापडला. 22 डिसेंबरपासून या रहस्यमयी मृत्युंना सुरुवात झाली होती. रशियातून चार मित्र भारतात आले होते. ते अगोदर दिल्लीला आले आणि नंतर 21 डिसेंबर रोजी ते ओडिशाला पोहोचले.
ओडिशातील रायगडा येथील हॉटेलमध्ये त्यांनी चेक इन केलं होतं. याच्या एका दिवसानंतरच हॉटेलमधील रूममध्ये पहिला मृतदेह सापडला होता. तीन परदेशी नागरिकांचे लागोपाठ मृत्यू होणं, ही घटनाच मुळात संशयास्पद आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला. मात्र, तपास सुरू झाल्यानंतर या प्रकरणाची गुंतागुंत आणखी वाढली आहे. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
हे ही वाचा : ‘प्रेयसीचं भूत मला सतावतं..’; घाबरलेल्या प्रियकराची पोलिसांसमोर कबुली अन् अखेर 8 महिन्यांनी त्या हत्येचा उलगडा
या प्रकरणातील घटनाक्रम जेम्स बाँड चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे रंजक आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पहिल्या नागरिकाचा मृत्यू हॉटेल रूममध्ये झाला होता. हृदयविकाराचा झटका आल्यानं ही रशियन व्यक्ती मरण पावल्याचं सांगितलं गेलं आहे. त्यानंतर बरोबर दोन दिवसांनी हॉटेलशेजारील एका बांधकामाधीन इमारतीत दुसऱ्या रशियन नागरिकाचा मृतदेह आढळला. हा मृत्यू आत्महत्या असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे तिसर्या मजल्यावरून खाली पडलेल्या मृतदेहाजवळ रक्ताचा एक थेंबही आढळला नाही. त्या व्यक्तीच्या शरीरावर कोणतीही जखम दिसली नाही. त्यानंतर 10 दिवसांनी हॉटेलपासून दूर अचानक तिसरा मृतदेह सापडला.
तीन मृत्यूंचा काय संबंध?
भारतात झालेल्या या तीन रशियन नागरिकांच्या मृत्यूंबाबत शंका आणि प्रश्न उपस्थित होत आहेत. यातील एका मृत्यूची तर रशिया, अमेरिका, ब्रिटन आणि युरोपपर्यंतच्या प्रसारमाध्यमांनी दखल घेतली आहे. कारण, रशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि खासदार पॉवेल अँटोनोव्ह यांचा समावेश या तीन मृतांमध्ये आहे. पॉवेल हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे विरोधक होते. त्यांच्या मृत्यूला रशियन सरकार जबाबदार असल्याची शंकादेखील उपस्थित केली जात आहेत.
22 डिसेंबर 2022, हॉटेल साई इंटरनॅशनल, रायगडा, ओडिशा
दक्षिण ओडिशातील रायगडामध्ये 22 डिसेंबर रोजी एका परदेशी पर्यटकाचा मृत्यू झाला. व्लादिमीर बेदेनोव्ह नाव असलेला हा पर्यटक आपल्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळला होता. हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्याला उचलून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अतिमद्यप्राशन केल्यानं हा मृत्यू झाल्याचं वाटल्यानं त्याबाबत फारसा गोंधळ झाला नाही. 61 वर्षीय बेदेनोव्ह यांनी आपल्या तीन रशियन सहकाऱ्यांसह 21 डिसेंबर रोजी रायगडातील हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं. मृत्यूपूर्वी त्यांनी खूप मद्यपान केलं होतं. पोलिसांना त्यांच्या खोलीत दारूच्या अनेक रिकाम्या बाटल्याही सापडल्या आहेत.
24 डिसेंबर 2022, हॉटेल साई इंटरनॅशनल, रायगडा, ओडिशा
यानंतर अवघ्या दोन दिवसांनी म्हणजेच 24 डिसेंबर (शनिवार) रोजी या प्रकरणाला नवीन वळण मिळालं. या दिवशी 65 वर्षीय पॉवेल अँटोनोव्ह यांचा रायगडामध्येच मृत्यू झाला. पॉवेल हे एक खासदार आणि श्रीमंत व्यापारी होते. शनिवारी संध्याकाळी पॉवेल त्यांच्या खोलीच्या खिडकीखाली पडलेले आढळले. हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. अशा प्रकारे, ओडिशातील रायगडामध्ये अवघ्या दोन दिवसांत दोन रशियन पर्यटकांचा मृत्यू झाला. पॉवेल यांच्या मृत्यूनं केवळ भारताचंच नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं.
3 जानेवारी 2023, पारादीप बंदर, जगतसिंगपूर जिल्हा, ओडिशा
पॉवेल अँटोनोव्ह यांच्या मृत्यूनंतर 10 दिवसांनी 3 जानेवारी 2023 रोजी आणखी एका रशियन नागरिकाचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला. हा तिसरा मृत्यू रायगडामधील हॉटेल साई इंटरनॅशनलपासून दूर असलेल्या पारादीप बंदरात झाला. 51 वर्षीय मिलायकोव्ह सर्गेई असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. मिलायकोव्ह हे एमबी अल्डाना जहाजावरील मुख्य अभियंता होते. हे जहाज बांगलादेशच्या चितगाव बंदरातून पारादीप बंदरमार्गे मुंबईला जात होतं. जहाजावर भारतीय आणि रशियन असे एकूण 23 क्रू मेंबर्स होते. 3 जानेवारी रोजी पहाटे 4.30 वाजता जहाजाच्या चेंबरमध्ये मिलायकोव्ह यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पारादीप पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष पीएल हरनानंद यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं सांगितलं आहे.
पोलिसांचा निष्काळजीपणा
पहिले दोन मृत्यू जितके गूढ होते तितक्याच गूढ त्यांच्या मृत्यूनंतर झालेल्या घडामोडी आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मृत्यूनंतर दोन्ही रशियन नागरिकांना नियमित स्मशानाऐवजी बांधकाम सुरू असलेल्या स्मशानभूमीत नेण्यात आलं. दोघांवर ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्यांचे मृतदेह जाळण्यात आले. पोस्टमॉर्टेमनंतर पोलिसांनी व्हिसेरा सॅम्पलदेखील जपून ठेवला नाही. गुन्हा घडलेल्या जागांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं. मात्र, त्यानंतर निर्माण झालेल्या गदारोळानंतर ओडिशा सरकारनं हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे सोपवलं आहे.
हे रशियन पर्यटक कोण होते?
बेदेनोव्ह आणि अँटोनोव्ह हे दोघे 63 वर्षीय मिखाईल तुरोव्ह आणि त्यांची पत्नी नतालिया पानासेन्को यांच्यासह रायगडामध्ये आले होते. त्यांच्यासोबत दिल्लीचा ट्रॅव्हल एजंट जितेंद्र सिंह होता. मिळालेल्या माहितीनुसार, हे पाच जण 19 डिसेंबर (सोमवार) रोजी दिल्लीहून भुवनेश्वरला पोहोचले होते. तेथून त्यांना ओडिशातील ग्रामीण भागाला भेट द्यायची होती. दुसऱ्या दिवशी (मंगळवार) सर्वजण ओडिशातील कंधमाल जिल्ह्यातील दरिंगबाडी या हिल स्टेशनला गेले होते. तिथे भेट दिल्यानंतर बुधवारी संध्याकाळी पाच वाजता रायगडामध्ये पोहोचले आणि तेथील हॉटेल साई इंटरनॅशनलमध्ये चेक इन केलं. त्यानंतर दोन दिवसांच्या अंतरानं बेदेनोव्ह आणि अँटोनोव्ह या दोघांचाही मृत्यू झाला.
रशियन खासदार अँटोनोव्ह यांच्या मृत्यूमध्ये गुंतागुंत
खासदार अँटोनोव्ह यांच्या मृत्यूबाबत सध्या अनेक शक्यता समोर आहेत. अँटोनोव्ह यांना मित्राच्या मृत्यूचा धक्का बसला आणि त्यांनी हॉटेलच्या खोलीतून खाली उडी मारून आत्महत्या केल्याची पहिली शक्यता आहे. तर, दुसरी शक्यता अशी आहे की, अँटोनोव्ह यांनी आपल्या मित्राप्रमाणे खूप मद्यपान केलं आणि पाय घसरल्यानं ते खोलीच्या खिडकीतून खाली पडले. याशिवाय, कट रचून त्यांचा खून झाल्याची तिसरी शक्यता आहे.
रशियन दूतावासानं फेटाळली कटाची शक्यता
मात्र, या सर्व शक्यताच आहेत. या प्रकरणाच्या तपासात गुन्हे शाखेला आतापर्यंत असं काहीही आढळलं नाही. कोलकात्यात उपस्थित असलेल्या रशियन वाणिज्य दूतावासाच्या प्रवक्त्यानंही या दोन्ही पर्यटकांच्या मृत्यूमागे कोणताही कट नसल्याचं म्हटलं आहे. तरीदेखील जगभरातून खासदार अँटोनोव्ह यांच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित होत आहे.
पुतीनविरोधक होते खासदार अँटोनोव्ह
रायगडा येथे मृत्यू झालेले रशियन खासदार पॉवेल अँटोनोव्ह यांची गणना तेथील प्रसिद्ध व्यक्तींमध्ये होते. अँटोनोव्ह हे केवळ खासदार आणि उद्योगपतीच नव्हते तर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर विरोधकही मानले जात होते. रशिया-युक्रेन युद्धाबाबत पुतीन यांच्या भूमिकेलाही त्यांनी विरोध केला होता. ज्यांनी युक्रेनवरील हल्ल्याबाबत टीका केली होती अशा अनेकांचा रशियामध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटना या पूर्वी घडलेल्या आहेत. शिवाय, अँटोनोव्ह यांच्या मृत्यूचा तपास आतापर्यंत ज्या पद्धतीने झाला आहे, यावरही प्रश्न उपस्थित केलं जात आहेत.
पोलिसांनी दोन्ही रशियन व्यक्तींचे मृतदेह जाळून त्यावर अंत्यसंस्कार केले. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचं शवविच्छेदन केलं पण त्यांचा व्हिसेरा ठेवला नाही. साधारणपणे, संशायस्पद मृत्यूच्या प्रकरणांमध्ये, मृत व्यक्तीच्या शरीरातील अंतर्गत अवयव व्हिसेरा म्हणून जतन केले जातात. जेणेकरून त्यांची टॉक्सीकॉलॉजी टेस्ट करून मृत्यूपूर्वी त्यांच्या पोटात काही विषारी पदार्थ होते की नाही हे शोधता येईल. पण, ओडिशा पोलिसांनी दोघांच्या अंत्यसंस्कारात आणि मृतदेह जाळण्यात घाई दाखवली.
रायगडाला भेट देण्याबाबत प्रश्नचिन्ह
या पर्यटकांनी भेट देण्यासाठी रायगडासारखं शहर निवडण्याबाबतही प्रश्न उपस्थित होते आहेत. परदेशी पर्यटकांमध्ये या शहराबद्दल फारसं आकर्षण नाही. अशा स्थितीत रशियन पर्यटकांचा हा गट ओडिशातील या निवांत शहराला भेट देण्यासाठी का पोहोचला, हाही मोठा प्रश्न आहे.
काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला संशय
काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनीही ट्विटमध्ये रशियन खासदार पॉवेल अँटोनोव्ह यांचा मृत्यू नैसर्गिक मृत्यू मानण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले, “ज्या प्रकारे ते त्यांच्या हॉटेलच्या खिडकीतून खाली पडले, त्यांच्या साथीदाराचा मृत्यू, दोघांवरही भारतातच अंत्यसंस्कार करण्यात आले या घटना संशयास्पद आहेत. ख्रिश्चन असूनही दोघांवरही हिंदू पद्धतीनं अंत्यसंस्कार झाले. यावरून असं दिसतं की ते नैसर्गिक मृत्यू नव्हते. जर हे मृत्यू नैसर्गिक असतील तर माझ्या कायद्याच्या शिक्षणाबाबत मलाच शंका आहे.” परदेशी प्रसारमाध्यमे खासदार पावेल अँटोनोव्ह यांच्या मृत्यूचा पुतीन यांच्याशी जोडत आहेत. अनेक वृत्तपत्रांनी लिहिलं आहे की, अँटोनोव्ह यांनी पुतीन यांच्यावर अनेकदा टीका केली होती.
तीन व्यक्तींची चौकशी सुरू
या प्रकरणाचा तपास करत असताना, ओडिशा पोलिसांची गुन्हे शाखा या पर्यटकांच्या गटातील उर्वरित तीन लोकांची चौकशी करत आहे. त्यापैकी दोन रशियन नागरिक आहेत, तर एक ट्रॅव्हल एजंट आहे. या तिघांनाही रायगडा येथून ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे आणण्यात आलं. गुन्हे शाखेचे आयजी अमितेंद्र नाथ सिंह यांनी तिघांचीही सखोल चौकशी केली. यानंतर तिघांनाही कटक येथील गुन्हे शाखेच्या मुख्यालयात नेण्यात आलं. जिथे अजूनही त्याची चौकशी सुरू आहे. हे तिघे संशयीत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं असलं तरी अद्याप कोणालाही क्लीन चिट दिलेली नाही.
पुतीन यांच्या अनेक टीकाकारांचा संशयास्पद मृत्यू
आतापर्यंत अनेक प्रसिद्ध रशियन उद्योगपती आणि श्रीमंत व्यक्तींचा संशयास्पद मृत्यू झालेले आहेत. या व्यक्ती पुतीन विरोधक होत्या. 1 सप्टेंबर 2022 रोजी, रशियन तेल कंपनी लुकेलचे प्रमुख रविल मॅगानोव्ह यांचादेखील मॉस्कोमधील रुग्णालयाच्या खिडकीतून पडून मृत्यू झाला होता.