मुजफ्फरनगर, 14 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर जिल्ह्यात खुनाच्या घटनेचा उलगडा झाला आहे. आरोपीने खून केल्याची कबुली दिल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याचा माग काढत आरोपीला अटक केली. धक्कादायक म्हणजे, खून झालेला तरुण 4 वर्षांपासून बेपत्ता होता. व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी तत्काळ घटना घडलेल्या गावातील घरात शोध घेतला. त्या घरात खोदकाम केल्यानंतर खून झालेल्या व्यक्तीचा सापळाच हाती लागल्याची घटना समोर आली. खुनाच्या या घटनेची माहिती कळताच मन्सुरपूर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या नारा गावात पोलीस पोहोचले आणि तपासात जे काही समोर दिसले ते पाहून तेही चक्रावून गेले. मन्सुरपूर ठाण्याचे एसएचओ बृजेंद्र सिंह रावत म्हणाले की, सलमान नावाच्या व्यक्तीच्या घरात खोदकाम करून सापळा ताब्यात घेतला आहे. याच गावात राहणाऱ्या मोहम्मद हसन नावाचा माणूस 12 नोव्हेंबर 2018 पासून बेपत्ता होता. या प्रकरणात सलमानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. (35 तुकडे केले,18 दिवस फ्रीजमध्ये ठेवले; मुंबईतील तरुणीची प्रियकराने दिल्लीत केली हत्या) सलमानने कबूल केला होता गुन्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोदकाम केल्यानंतर सापडलेला सापळा हा मोहम्मद हसनचाच आहे की नाही याची खात्री करण्यासाठी तो सापळा फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. एका व्यक्तीचा खून करून मृतदेह घरातच पुरुन ठेवल्याचं सलमानने लोकांसमोर सांगितले आणि गुन्हा कबूल केला होता. गुन्हा कबूल करताना एका व्यक्तीनं सलमानचं बोलणं रेकॉर्ड करत ते व्हायरल केलं होतं. हसनच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत कळवलं होतं. बेपत्ता हसनचे कुटुंबीय घेत होते शोध मोहम्मद हसन हा मागील चार वर्षांपासून बेपत्ता होता. तो सापडत नसल्याने कुटुंबीय त्याच्या शोधात होते. तो एक ना एक दिवस घरी परत येईल, अशी अपेक्षा कुटुंबीयांना होती. परंतु चार वर्षानंतरही तो परत न आल्याने कुटुंबीयांनी तो कुठतरी निघून गेल्याचा समज केला होता. पण अचानक सलमानने खुनाची कबुली दिल्याचा व्हिडिओ त्यांना मिळाला आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत सांगितले. त्यानंतर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तत्काळ पावले उचलत सलमानच्या घरात खोदकाम केले आणि हा सर्व प्रकार समोर आला. (आईने स्वतःच्या प्रियकरासोबत लावलं पोटच्या अल्पवयीन मुलीचं लग्न, अन्.., पुण्यातील हादरवणारी घटना) साडेचार फूट खोल खड्ड्यात पुरला होता मृतदेह गावातील लोकांना संशय आल्यानं त्यांनी सलमानचं घर गाठलं. तिथं पाहणी करत थोडं खोदकाम केलं तर एक चप्पल दिसली. त्यानंतर पोलिसांना याबाबत कळवण्यात आलं. पोलिस आल्यानंतर बाकीची कारवाई केली गेली. तेव्हा कपड्यामध्ये गुंडाळलेला सापळाच पोलिसांच्या हाती लागला. कपडे आणि चप्पच्या आधारे तो मृतदेह हसनचाच असल्याचं समोर आलं. पोलिस अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.