गँगस्टर रवी पुजारीचा खरा फोटो आला समोर, मुंबई पोलिसांनी केली अटक

गँगस्टर रवी पुजारीचा खरा फोटो आला समोर, मुंबई पोलिसांनी केली अटक

अँथोनी फर्नांडिस हे नाव बदलून रवी पुजारी गेली 8-10 वर्षे आफ्रिकेतील सेनेगल मधील डकारमध्ये राहत होता.

  • Share this:

मुंबई, 23 फेब्रुवारी : अखेर मुंबई पोलिसांना कुख्यात गॅंगस्टर रवी पुजारीचा ताबा मिळाला. साऊथ आफ्रिकेतील सेनेगल न्यायालयाने मुंबई पोलिसांना रवी पुजारीचा ताबा घेण्यासाठी गेल्या आठवड्यात परवानगी दिली होती. गेली वर्षभर मुंबई पोलीस रवी पुजारीचा ताबा मिळाला याकरता न्यायालयीन लढा देत होते. त्या लढ्याला अखेर यश आले आहे. आज सकाळी 6 वाजता रवी पुजारीला मुंबई पोलीस कर्नाटकातून घेवून आले.

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच रवी पुजारीला  आफ्रिका खंडातील सेनेगल येथून त्याला अटक करण्यात आली होती. रवी पुजारी हा अँथोनी फर्नांडीस या नावाने वावरत होता. सेनेगलमधील तपास यंत्रणांच्या लेखी दस्तावेजात याच नावाची नोंद आहे. त्यावेळेस बुर्किना फासो या देशाचा पासपोर्ट रवी पुजारी कडून जप्त केला होता. मलेशिया, मोरोक्को आणि  थायलंड, पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो, कोंगो रिपब्लिक, गिनी, आयव्हरी कोस्ट आणि सेनेगल या देशांत सतत रवी पुजारी ठिकाण बदलून राहत होता.

एवढंच नाही तर खंडणी उकळून मिळालेल्या पैशातून रवी पुजारीने “नमस्ते इंडिया या नावाने अनेक मोठे रेस्टोरंट सुरू केले होते. तर सेनेगलची राजधानी डकारमधील श्रीमंतांपैकी एक अशी ओळख रवी पुजारीची झाली होती. रवी पुजारीवर सतत भारतीय गुप्तचर यंत्रणांची नजर होतीच, यामुळे वेळ मिळताच सापळा लावून रवी पुजारी याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.

अँथोनी फर्नांडिस हे नाव बदलून रवी पुजारी गेली 8-10 वर्षे आफ्रिकेतील सेनेगल मधील डकारमध्ये राहत होता. गेल्या वर्षी अटक झाल्यावर फरार झालेला रवी पुजारी पुन्हा आपली संपत्ती आणि परिवाराला घेऊन जाण्यास डकारमध्ये आला होता. पण हा भारतीय गुप्तचर यंत्रणांचा सापळा होता. ज्यात रवी पुजारी सहज अडकला. याआधी रवी पुजारीच्या वतीने प्रत्यार्पणास आव्हान देणारी याचिका सेनेगलच्या सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सेनेगल सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्याने पुजारीची चारही बाजूने कोंडी झाली होती.

रवी पुजारीवर संपूर्ण भारतात हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, खंडणीसाठी धमकावणे, बेकायदेशीर कृत्य करणे, संघटित गुन्हेगारी करणे यांसारखे  250 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत.

- कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरातमध्ये सर्वाधिक गुन्हे रवी पुजारीवर आहेत

- कर्नाटक राज्यांत बंगळूरूमध्ये 39 गुन्हे, मंगळूरमध्ये 36, उडुपीमध्ये 11 तर म्हैसूर, हुबळी-धारवाड, कोलार आणि शिवमोगामध्ये प्रत्येकी एक गुन्हा पुजारीविरुद्ध दाखल आहे.

- महाराष्ट्र मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये पुजारीविरुद्ध 49 गुन्ह्यांची नोंद आहे. त्यातील 26 गुन्हे मकोकाखाली दाखल झाले.

- गुजरातमध्ये त्याच्याविरुद्ध खंडणी प्रकरणी 75 गुन्ह्यांची नोंद आहे.

Published by: sachin Salve
First published: February 23, 2021, 4:32 PM IST

ताज्या बातम्या