नवी दिल्ली 06 जानेवारी : न्यूयॉर्कहून दिल्लीला येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानात एक धक्कादायक घटना घडली होती. या विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये नशेत असलेल्या पुरुष प्रवाशाने एका महिला प्रवाशाच्या अंगावर लघुशंका केली होती. 26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाच्या फ्लाइट AI-102 मध्ये ही घटना घडली होती. आता महिला प्रवाशाच्या अंगावर लघवी करणाऱ्या पुरुष प्रवाशाची ओळख पटली असून, त्याचं नाव शंकर मिश्रा असल्याचं समोर आलंय.
‘आज तक’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात मद्यधुंद अवस्थेत महिला प्रवाशावर लघवी करण्याचं लज्जास्पद कृत्य करणाऱ्या व्यक्तीचं नाव शंकर मिश्रा असं आहे. तो मुंबईचा रहिवासी असून एअर इंडियाने मिश्राविरोधात केलेल्या तक्रारीनंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही घटना 26 नोव्हेंबर 2022ची आहे; पण एअर इंडियाने 28 डिसेंबर 2022 रोजी पोलिसांना याची माहिती दिली होती. तसंच एअर इंडियानं काल, गुरुवारी (5 जानेवारी 2023) डीजीसीएला या प्रकरणी एक अहवालही सादर केलाय. या घटनेला एक महिन्याहून अधिक काळ लोटूनही तक्रार का नोंदवली नाही, याचं स्पष्टीकरण त्यात एअर इंडियाकडून देण्यात आलं आहे.
मिश्रा याचा पोलिसांकडून शोध सुरू
विमानात महिला प्रवाशावर लघवी करण्याचं लज्जास्पद कृत्य करणारा शंकर मिश्रा फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिस पथकं मुंबईला पाठवण्यात आल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की, ‘मिश्रा हा मुंबईचा रहिवासी आहे. आम्ही आमची टीम त्याच्या घरी मुंबईला पाठवली होती; पण तो त्यापूर्वीच फरार झाला. त्याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.’ दुसरीकडे पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी शंकर मिश्राविरुद्ध भादंवि कलम 294, 354, 509 आणि 510, तसxच विमान नियमांनुसार गुन्हा दाखल केलाय.
आरोपी मिश्रा कोण आहे?
मुंबईचा रहिवासी असलेला आरोपी शंकर मिश्रा हा वेल्स फार्गो कंपनीचा उपाध्यक्ष आहे. ही कंपनी अमेरिकेच्या मल्टिनॅशनल फायनान्स सर्व्हिसेस कॉर्पोरेशनशी संबंधित आहे. एअर इंडियानं मिश्रा याच्यावर कारवाई करून त्याला एअर इंडियाच्या विमानातून 30 दिवसांची प्रवास बंदी घातली आहे. तसंच एअर इंडियानं दिल्लीतल्या पालम पोलीस ठाण्यात शंकर मिश्रा याच्याविरुद्ध तक्रार दाखल केलीय.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने घेतली गंभीर दखल
दरम्यान, एअर इंडियाच्या दोन विमानांमध्ये मद्यधुंद प्रवाशांनी महिला प्रवाशांवर लघवी केल्याच्या घटना घडल्यात. त्यामुळे या वेगवेगळ्या घटनांवरून नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एअर इंडियाला नोटीस बजावली आहे. पहिली घटना 26 नोव्हेंबर 2022 ची आहे, ज्यात न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका मद्यधुंद व्यक्तीनं महिला प्रवाशावर लघवी केली होती. दुसरी घटना 6 डिसेंबर 2022 ची आहे, ज्यात पॅरिसहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बसलेल्या एका मद्यधुंद व्यक्तीनं एका महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केली होती.
पहिल्या प्रकरणात, डीजीसीएने एअर इंडियाला फटकारलं आणि म्हटलं आहे, की ‘या संपूर्ण प्रकरणात एअरलाइनची भूमिका अव्यावसायिक आहे.’ तसंच एअर इंडियाचं व्यवस्थापन आणि केबिन क्रू मेंबर्सना नोटीस बजावण्यात आली असून, या प्रकरणी कारवाई का करू नये, अशी विचारणा केली आहे. तसंच, 6 डिसेंबर 2022 रोजी पॅरिसहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातल्या एका महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केल्याप्रकरणी डीजीसीएने एअर इंडियाला नोटीसही बजावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Air india, Shocking news